बेलापूर येथील व्यापारी खटोड यांच्यावरील गुन्ह्याची चौकशी करा! ग्रामस्थांसह व्यापार्यांची निवेदनातून पोलीस उपअधीक्षक संदीप मिटकेंकडे मागणी
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील बेलापूर येथील सुनील गायकवाड यांच्या आत्महत्येप्रकरणी व्यापारी राजेश व हनुमंत खटोड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची चौकशी करावी व व्यापार्यांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. त्यावर या प्रकरणाच्या तपासात पुरावे आढळल्यास कारवाई केली जाईल आणि कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिले.
मयत सुनील गायकवाड काही महिन्यापूर्वी खटोड यांच्याकडे खोदकाम करत असताना गुप्तधन आढळून आले होते. याबाबत सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून खटोड बंधू यांनी हे गुप्तधन सरकार जमा केलेले आहे. मयत सुनील गायकवाड यांनी दोन महिन्यांपूर्वी तहसीलदारांसमोर प्रतिज्ञापत्रही करून दिलेले आहे. त्यानंतर मयत सुनील व खटोड बंधू यांचा प्रत्यक्ष अथवा फोनवर कोणताही संबंध आलेला नाही. त्यांच्या आत्महत्येशी खटोड बंधू व गुप्तधन प्रकरणाचा कोणताही संबंध नाही.
वास्तविक मयत सुनील व त्यांची तक्रारदार पत्नी यांच्यामध्ये कौटुंबिक वाद झाले होते, म्हणून ती माहेरी राहत होती. शिवाय मयत सुनील गायकवाड यांनी कोणत्याही प्रकारचा पुरावा अथवा सुसाईड नोट नाही, त्यांनी कुठल्याही प्रकारचा तक्रार अर्ज खटोड बंधू यांच्याविरुध्द पोलिसांकडे केलेला नाही. परंतु तक्रारदार पत्नीला खटोड बंधू यांच्यावर खोटेनाटे आरोप करून काही जणांनी दबाव आणून फिर्याद दाखल करण्यास भाग पाडले आहे. या लोकांची चौकशी करून त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सर्व बाजूने तपास करुन आर्थिक लाभासाठी दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणी करून सनदशीर मार्गाने आंदोलन करून गाव बंद ठेवण्याचा इशाराही ग्रामस्थांसह सर्वपक्षीयांच्यावतीने निवेदनात देण्यात आलेला आहे.
सदर निवेदन देताना जिल्हा टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मुथ्था, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा, किराणा मर्चंटचे अध्यक्ष शांतीलाल हिरण, माजी सरपंच भरत साळुंके, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, अजय डाकले, जनता आघाडीचे अध्यक्ष रवी खटोड, बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव शरद सोमाणी, अशोक पवार, अनिल नाईक, लोहन दरक, प्रशांत बिहाणी, प्रकाश कुर्हे, राजेंद्र लखोटिया, जुगलकिशोर मुंदडा, राजेश राठी, अनिल मुंडलिक, राजेंद्र मुंदडा, चंद्रशेखर डावरे, सचिन जोशी, गौरव सिकची आदिंसह व्यापारी उपस्थित होते.