तीनबत्ती चौकातील ‘लजीज चिकन सेंटर’ अखेर ‘सील’! नियमांची ऐशीतैशी करुन चिकन रापणाऱ्यांची पळापळ; एका मिठाई दुकानासह भांड्याचे दुकानही ‘सील’…

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या पंधरा दिवसांमध्ये जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात कोविड संक्रमणाच्या सरासरीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्याच्या पठार भागातून दररोज धक्कादायक रुग्ण समोर येऊ लागल्याने संपूर्ण तालुक्याच्या चिंता वाढल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकार्यांच्या आवाहनावरुन साकूर व आश्वी गटात सध्या कडकडीत ‘टाळेबंदी’ही पाळली जात आहे. एकीकडे पुन्हा भयानक स्थिती निर्माण होत असतांना दुसरीकडे नियमांची ऐशीतैशी करणाऱ्यांची संख्याही दररोज समोर येत आहे. असाच प्रकार आज सायंकाळी समोर आला. फक्त पार्सल सुविधा सुरु ठेवण्यास परवानगी असतांना नियम पायदळी तुडवित आपल्या दुकानात ग्राहकांची नियमबाह्य गर्दी जमविणाऱ्या एका चिकन सेंटरसह मिठाई व स्टील भांड्यांंचे दुकान अनिश्चित कालावधीसाठी ‘सील’ करण्यात आले आहे. रविवारी जोर्वेनाका परिसरातील एका मंगल कार्यालयावर अशीच कारवाई झाली होती. त्यानंतर आज शहरातील मोठे नाव असलेल्या आस्थापनांवर कारवाई झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या कारवाईतून अशाप्रकारे नियम तोडून व्यवसाय करणाऱ्यांना नेमका ‘संदेश’ही गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रशासन ‘एकाच’ भागात कारवाई करीत असल्याबाबत उठलेली चर्चेची राळ या कारवाईने काही अंशी खाली बसली आहे. नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नवीन नगर रोडवरील विश्वजीत साई मेटल स्टोअर्स या नावाचे स्टील भांड्यांचे दुकान मनाई असतानाही सुरु होते. नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांच्या पथकाने तेथे छापा घातला असता दुकानात नियमांचे सर्रास उल्लंघन करुन मोठ्या संख्येने ग्राहक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत संबंधित दुकानदाराकडे विचारणा केली असता त्याच्याकडून विरोधाभासी उत्तरे मिळू लागल्याने, अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार त्यांचे दुकान अनिश्चित कालावधीसाठी ‘सील’ करण्यात आले. तेथून पुढे जोशी या मिठाईच्या दुकानात केवळ बाहेरुन पार्सलची परवानगी असताना काही ग्राहक आत जावून मिठाई घेत असल्याचे पथकाला दिसले. त्यावरुन या आस्थापनेवरही ‘सील’ करण्याची कारवाई करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून पालिका आणि पोलीस प्रशासन शहरातील एकाच भागातील सहनशील नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत होता. पालिका आणि पोलिस प्रशासनाची भूमिकाही तशीच होती, हा भाग वेगळा. मात्र या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम देत प्रशासनाने सर्रास नियमांचे उल्लंघन होणाऱ्या तीनबत्ती चौक परिसरात सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास छापा घातला. यावेळी तपासणीत ‘लजीज चिकन सेंटर’ या मांसाहारी खवय्यांसाठी परिचित असलेल्या हॉटेलमध्ये नियमांची ऐसीतैसी करीत ग्राहकांची तुफान गर्दी झाली होती. हा सगळा प्रकार पाहून कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकालाही काही क्षण कोविडचा विसर पडला होता. याबाबत हॉटेल चालकाकडे विचारणा केली असता नेहमीप्रमाणे साचेबद्ध उत्तर मिळाले. त्यातून समाधान न झाल्याने नायब तहसीलदार कडनोर यांनी सदरचे हॉटेल ग्राहकमुक्त करुन त्याला ‘सील’ ठोकले. विशेष म्हणजे ही कारवाई करुन पथकाची पाठ फिरताच; ‘काय झाले?’ याची विचारणा करण्यासाठी दीडशे ते दोनशे जणांनी या परिसरात गर्दी केली होती.

नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांनी सर्व प्रकारचा दबाव झुगारुन, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा ठाम निर्धार केल्याने त्यांची ही कारवाई गेल्या काही दिवसांपासून प्रशासना विरोधात एका भागातील नागरिकांमध्ये सुरु असलेल्या उलटसुलट चर्चेची राळ खाली बसविणारी ठरली. अन्यथा प्रशासनाच्या एकाच भागातील सक्तीमूळे नागरिकांमध्ये काहीसा नाराजीचा आणि संतापाचा सूर होता. आज नाहीतर उद्या आंदोलनाच्या माध्यमातून त्याचा उद्रेकही समोर येण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र आज या कारवाईने प्रशासन कारवाईतही ‘समानता’ ठेवीत असल्याचा ‘संदेश’ जनमानसात गेल्याने प्रशासनाविरोधात एका भागात झालेले वातावरण काही अंशी निवळले आहे असेच म्हणावे लागेल.

विशेष म्हणजे रविवारी जोर्वे नाका परिसरातील ‘जेडी लॉन्स’ या कार्यालयात कोविड नियमांचे सर्रास उल्लंघन करुन मोठ्या संख्येने पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत विवाह सोहळा साजरा होत होता. नायब तहसीलदार उमाकांत नडनोर यांंनी त्या ठिकाणी छापा घालून सदरचे कार्यालय अनिश्चित कालावधीसाठी रविवारीच ‘सील’ केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर संगमनेर तालुक्यातील ही पहिली तर जिल्ह्यातील शेवगाव नंतरची दुसरी कारवाई ठरली होती. आता आज एकाचवेळी संगमनेर शहरातील दोन हॉटेल्ससह एक भांड्याचे दुकानही सील झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Visits: 240 Today: 2 Total: 1417281
