सोयर्‍या-धायर्‍यांच्या राजकारणात आणखी नव्या समीकरणांची भर! मंत्री गडाखांच्या मुलाशी माजी आमदार घुलेंची कन्या होणार विवाहबद्ध

नायक वृत्तसेवा, नेवासा
गेल्या काही दिवसांपासून चर्चा असलेली अहमदनगर जिल्ह्यातील एक राजकीय सोयरिक अखेर जुळून आली. त्यामुळे जिल्ह्याच्या सोयर्‍या-धायर्‍यांच्या राजकारणात आणखी नव्या समीकरणांची भर पडली आहे. मुख्य म्हणजे लवकरच होणार्‍या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ही नवी सोयरीक एका जुन्या सोयर्‍यांच्या गटाला धक्का देणारी मानली जात आहे.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे नातू आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख यांचा विवाह राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ. निवेदिता यांच्याशी करण्याचे ठरले आहे. उदयन यांनी अहमदनगरमध्ये तर निवेदिता यांनी पुण्यात शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर उदयन नेवासा तालुक्यात राजकारणात सक्रीय झाले आहेत. अहमदनगर जिल्हा सोयर्‍या-धायर्‍यांच्या राजकारणासाठी ओळखला जातो. सर्वच पक्षातील अनेक नेते एकमेकांचे सोयरे आहेत. त्यात आणखी काही नव्या समीकरणांची भर पडत आहे. असेच एक हे समीकरण जुळून आले आहे. गडाख आणि घुले यांचे विधानसभा मतदारसंघही शेजारी शेजारी आहेत. महाविकास आघाडीमुळे राजकीयदृष्ट्याही ते एकत्र आलेले आहेत. केवळ ते दोघेच नाहीत तर जिल्ह्यातील अन्य नेत्यांचा गोतावळाही जुळवाजुळव करताना दिसत आहे.

या नव्या नातेसंबंधांची राजकीय झलक आगामी विधान परिषद निवडणुकीत पाहायला मिळेल असा अंदाज बांधला जाऊ लागला आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांचे सोयरे असलेले सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण जगताप आणि दुसरे सोयरे कोतकर यांचे समर्थक यांची मदत घेतली जाणार आहे. शिवाय भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्डिलेंना ताकद दिल्याचे सांगण्यात येते. या समीकरणाविरोधात आता घुले-गडाख-थोरात हे सोयरे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

घुलेंना राष्ट्रवादीकडून ही निवडणूक लढवायची आहे. नव्या सोयरिकीमुळे गडाखांशी संबंध, त्यातून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत जवळचे नातेसंबंध तयार होत आहेत. त्यामुळे अहमदनगरमधील सोर्‍या-धायर्‍यांच्या गटाला शेवगाव-नेवासामधील हा नवा गट शह देण्यासाठी रिंगणात उतरेल, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. अर्थात एवढी एकच निवडणूक नव्हे तर भविष्यातही या नव्या समीकरणाचे विविध निवडणुकांवर परिणाम दिसून येण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. जसा घुले यांना गडाखांचा फायदा होणार आहे तसाच गडाख यांनाही विधानसभा आणि नेवासा तालुक्यातील अन्य राजकारणासाठी घुलेंचा फायदा होणार आहे.

Visits: 130 Today: 2 Total: 1102760

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *