संगमनेरमध्ये उद्योजकांची मांदियाळी; सॅटर्डे क्लबची मीटिंग उत्साहात विविध उद्योजकांशी ओळख; व्यवसायाच्या संधी व व्यवहार केले जाहीर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्रातील उद्योजकांनी आपापसात व्यापार करून एकमेकांच्या व्यापार वृद्धीसाठी प्रयत्न करण्याची संकल्पना समोर ठेवून सॅटर्डे क्लब नाशिक येथे सुरू करण्यात आला. यानंतर उद्योजक जोडले गेल्याने सॅटर्डे क्लब महाराष्ट्रभर पसरला. संगमनेर येथेही 50 पेक्षाही जास्त उद्योजकांचा हा सॅटर्डे क्लब मोठ्या प्रमाणावर आपापल्या उद्योग व्यवसायात वाढ करीत आहेत. क्लबच्या माध्यमातून रविवारी (ता.14) संगमनेर येथील मालपाणी क्लब येथे स्पीड नेटवर्किंग मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते. या मीटिंगसाठी नाशिकहून सुमारे चाळीस उद्योजक तर संगमनेर येथील 30 उद्योजक व व्यावसायिक असे एकूण 70 उद्योजक यामध्ये सहभागी झाले होते. या मीटिंगसाठी नाशिक व अहमदनगरचे रिजनल हेड अमोल कासार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

स्पीड नेटवर्किंग मीटिंगमध्ये सहभागी झालेला प्रत्येक उद्योजक एकमेकाशी स्वतंत्रपणे बोलू शकेल अशा पद्धतीची रचना करण्यात आली होती. याचा उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा उद्योग स्वतंत्रपणे समजावून घेणे व त्यांना त्यांच्या उद्योगासाठी काय मदत करता येईल हे सांगणे अतिशय सोपे जाते. मीटिंगसाठी आलेल्या प्रत्येक उद्योजकाची येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक उद्योजकासमवेत एक मिनिटाची व्यक्तिगत चर्चा झाली. तसेच काही उद्योजकांनी त्यांच्या उद्योगांचे स्टॉल सुद्धा लावले होते. मीटिंग संपल्यानंतर याद्वारे निर्माण झालेल्या व्यवसायाच्या संधी आणि त्याच क्षणी झालेले व्यवहारही जाहीर करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात अमोल कासार यांनी सॅटर्डे क्लबचे उद्योगातील महत्व व संगमनेरमधील उद्योजकांनी क्लबच्या माध्यमातून कशाप्रकारे आपल्या व्यवसायात वाढ केली आहे. तसेच क्लबच्या संपर्कातून उत्पादित माल भारताबाहेर निर्यात केला जात आहे असे सांगितले. सॅटर्डे क्लबद्वारे उद्योगांतील निर्माण झालेल्या नवीन संधींबद्दल उपस्थित मान्यवरांनी आभार मानले. सॅटर्डे क्लबमध्ये प्रवेश घेतल्यानंतर उद्योग आकलन, उद्योग क्षेत्रातील बारकावे, शासकीय सवलती, व्यवहाराचे नियम, नवीन जी.एस.टी. नियमावली, ब्रँडींग, मार्केटिंग या विषयांचे आकलन तर होतेच. पण त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभर या क्लबमध्ये सामील असलेल्या उद्योजकांशी ओळख निर्माण होते. आपला व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने सॅटर्डे क्लब मोलाचे काम करीत आहे. या मीटिंगसाठी नाशिक चाप्टरच्या अध्यक्षा अश्विनी कुलकर्णी, गोदावरी चाप्टरचे अध्यक्ष किशोर लोळगे, नाशिक वन चाप्टरचे अध्यक्ष योगेश सोंजे, सिन्नर चाप्टरचे अध्यक्ष अवधूत वाघ, संगमनेर चाप्टरचे अध्यक्ष सागर हासे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्तविक सेक्रेटरी डॉ. सागर गोपाळे तर आभार खजिनदार मयूर पवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *