आधारकार्ड प्रमाणीकरण करण्यासाठी 15 नोव्हेंबर शेवटची मुदत अन्यथा दहा हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता

नायक वृत्तसेवा, नगर
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी सत्तेवर आल्यानंतर जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यात अहमदनगर जिल्ह्याचा राज्यात पहिला क्रमांक आहे. असे असले तरीही जिल्ह्यात सुमारे दहा हजार शेतकर्‍यांनी त्यांच्या बँक खात्याशी आधारकार्ड प्रमाणीकरण केलेले नाही. त्यांच्यासाठी 15 नोव्हेंबर ही शेवटची मुदत देण्यात आली असून त्याकाळात हे काम झाले नाही, तर हे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आल्यावर त्यांनी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. शेतकर्‍यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज या योजनेत माफ केले गेले होते. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्ह्याचा राज्यात पहिला क्रमांक आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 2 लाख 86 हजार 861 शेतकर्‍यांना 1 हजार 742 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे. राज्यात कर्जमाफी मिळालेल्या शेतकरी संख्येमध्ये आणि कर्जमाफीच्या रकमेमध्ये अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अहमदनगर जिल्ह्याचे काम राज्यामध्ये आघाडीवर आहे. मात्र, या कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यात काही पात्र शेतकरी वंचित राहिले होते, अशा 5 हजार 300 शेतकर्‍यांची यादी राज्य शासनाने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. नव्याने यादीत आलेले हे शेतकरी तसेच पूर्वीच्या यादीत शिल्लक राहिलेले 4 हजार 678 असे मिळून 9 हजार 978 शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण केले नाही तर संबंधित शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहणार आहेत.

महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकर्‍यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी पहिल्या टप्प्यात दिली आहे. याचवेळी नियमितपणे कृषी कर्ज फेडणारांना 50 हजार तसेच 2 लाखांवर कर्ज असलेल्यांनाही दोन लाखांवरील थकबाकीपैकी काहीअंशी माफी देण्याचे घोषित केले होते. पण नंतर मार्च 2020 पासून कोरोनाचा प्रकोप झाल्याने या दोन्ही नव्या माफीच्या योजना अजूनपर्यंत प्रत्यक्षात आलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांमधून या योजनांच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे.

Visits: 17 Today: 1 Total: 115769

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *