भंडारदरा धरण परिसरातील रस्त्यांचे काम निकृष्ट शेंडी येथील माजी सैनिकाच्या कुटुंबियांना बसला फटका

नायक वृत्तसेवा, भंडारदरा
अकोले तालुक्यातील पर्यटनाची पंढरी म्हणून परिचित असलेल्या भंडारदरा धरण परिसरातील रस्त्यांच्या कामांचा निकृष्टपणा उघडा पडला असून त्याचा फटका शेंडी येथील एका माजी सैनिकाच्या कुटुंबियांना बसला आहे.

भंडारदरा धरण परिसरात कोट्यवधी रुपये खर्च करुन रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. त्यामध्ये रंधा ते वारंघुशी याही रस्त्याच्या डांबरीकरणाचा समावेश असून या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून आले आहे. सलग आठ दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर केलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाला ठिकठिकाणी आत्ताच खड्डे पडले आहेत. तर डांबरीकरण केलेल्या रस्त्यांवर मातीच माती झालेली दिसून येत आहे. बर्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडून अपघात होण्याचे सत्र सुरू झाले आहे. तर रस्त्याच्या कडेला पाणी जाण्यासाठी साईड गटारी न काढल्यामुळे टाकलेला भराव खचून वाहून गेला आहे. शेंडी येथे या ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा फटका एका निवृत्त माजी सैनिकासह त्याच्या कुटुंबियांस बसला आहे. शनिवारी झालेल्या प्रचंड पावसामध्ये रस्त्यावर टाकलेला भराव खचल्यामुळे पाण्याच्या लोंढ्यासह मातीचा सर्व भराव हौशीराम त्र्यंबक मधे यांच्या राहत्या घरात घुसून सर्व संसारोपयोगी सामानाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी तत्काळ शेंडी येथील सरपंच दिलीप भांगरे यांनी केली असून संबंधित नुकसान झालेल्या कुटुंबाला ठेकेदाराने तत्काळ मदत करावी असे सांगितले आहे.

तर याच पावसाने घाटघर फाट्याजवळही रस्त्याचा भराव वाहून गेला आहे. तसेच घाटघरकडे जाणार्या रस्त्याचेही डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण झालेले असताना याही रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था पाहावयास मिळत आहे. पावसामुळे याही रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी सिमेंट वाहून गेल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांनी व संबंधित रस्त्याचे काम करणार्या ठेकेदारांनी मात्र याकडे डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे.
