सोशल माध्यमांतील आक्षेपार्ह मजकूरामुळे संगमनेरात तणाव! संतप्त जमावाचा पोलिस ठाण्यात ठिय्या; आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बनावट नावाचा वापर करुन सोशल माध्यमातील फेसबुकवर मुस्लिम समाजाच्या धर्मगुरुंंबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहून तो प्रसारित करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही बाब समोर येताच संतप्त जमावाने एकत्रित येवून या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदविला असून दोषी असलेल्यांचा तत्काळ शोध घेवून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी जमलेल्या मोठ्या जमावाने शहर पोलिस ठाण्याच्या आवारातच ठिय्या दिला आहे. पोलिसांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले असून शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. सध्या संगमनेरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोशल माध्यमातील फेसबूक या लोकप्रिय साइटवर एका अज्ञात विकृताने बनावट नावाचा वापर करून मुस्लिम धर्मियांच्या पवित्र धर्मगुरुंंबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला. या मजकुराला तशाच विचाराच्या अन्य काहींंनी लाईकही केले. ही गोष्ट संगमनेरातील मुस्लिम समाजातील काहींच्या लक्षात आल्यानंतर त्याबाबतची चर्चा सुरू झाली. आपल्या धर्मगुरुं बाबत अशा पद्धतीचा मजकूर प्रसारित झाल्याने अनेक नागरिक घराबाहेर पडून तीनबत्ती चौकात जमा झाले. या ठिकाणी या प्रकाराचा जाहीर निषेध करून जमलेला जमाव शहर पोलीस ठाण्यात पोहोचला. यावेळी जमावासोबत असलेल्या मुस्लिम समाजातील आजी-माजी नगरसेवकांसह ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिकांनी पोलीस उपअधीक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना मुस्लिम नागरिकांच्या तीव्र भावना सांगितल्या. यावर दोषी असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही असे आश्वासन पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
शहरात सर्व काही सुरळीतपणे सुरू असताना कोणीतरी विघ्नसंतोषी व्यक्तीने दोन समाजात दुही निर्माण करण्यासाठी असा प्रकार केला असावा. त्याचा त्वरित बंदोबस्त केला जाईल. त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी अहमदनगरच्या साइबर पोलिसांची मदत घेतली जात आहे. या संतापजनक प्रकाराला जबाबदार असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घातले जाणार नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कायद्यावर भरवसा ठेवावा व शांतता राखावी असे आवाहन पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी केले आहे. सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे
एकीकडे पोलीस ठाण्यात संबंधित विकृत व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोठा जमाव ठाण मांडून बसलेला असताना दुसरीकडे संगमनेर बस स्थानकाजवळ काहीजणांनी एकत्रित येवून जोरदार घोषणाबाजी केली. भर महामार्गावरच हा सर्व प्रकार सुरू असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घोषणाबाजीमुळे बसस्थानक परिसरातील दुकानेही घाईघाईने बंद झाल्याने शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. मात्र शहरात कुठेही कोणतीही अनुचित घटना घडल्याचे वृत्त नसून सर्वत्र शांतता आहे. पोलिसांकडून शहरातील गस्त वाढवण्यात आली असून बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.
Visits: 178 Today: 2 Total: 1595299

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *