वेल्हाळे शिवारात चोरटी दारु वाहतूक करणारा कंटेनर पकडला! राज्य उत्पादन शुल्क पुणे भरारी पथकाची कामगिरी; सत्तर लाखांचा मुद्देमाल हस्तगत..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही महिन्यांपासून विविध घटना आणि घडामोडींचे केंद्र राहीलेल्या संगमनेर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे येथील भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पथकाने दारुची चोरटी वाहतूक करणारा ‘कंटेनर’ ताब्यात घेतला असून त्यातून वाहतूक होत असलेल्या दारुच्या 40 हजार 656 बाटल्यांसह एकूण 69 लाख 13 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुणे आणि संगमनेरच्या संयुक्त पथकाने केलेल्या या कारवाईत कंटेनरचा चालक सूर्यकुमार शिरसाट याला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईने दारुचा चोरटा व्यवसाय करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.


याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार विभागाच्या पुणे येथील भरारी पथकाला खबर्‍यामार्फत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पुणे विभागाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे, संगमनेरचे निरीक्षक आर.डी.वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक शहाजी गायकवाड, संजय बोधे, एस.एन.इंगळे, गणेश सुळे संगमनेरचे दुय्यम निरीक्षक एस.जे.यादव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस.आर.वाघ, जवान प्रताप कदम, अमर कांबळे, अहमद शेख, भरत नेमाडे, शशांक झिंगळे, सतीश पोंधे, अनिल थोरात, विजय पाटोळे, सचिन गुंजाळ, तौसिफ शेख यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसारचा कंटेनर नाशिक-पुणे महामार्गावरील वेल्हाळे शिवारात अडविला.


यावेळी पथकातील अधिकार्‍यांनी कंटेरनरमध्ये काय आहे याची चालकाकडे विचारणा केली असता त्याने कापसाचे सुत घेवून निघाल्याचे सांगत एव्हीजी लॉजीस्टिक प्रा.लि. (दिल्ली) या वाहतूक कंपनीची बिल्टी व खजुरिया टेक्सटाईल मिल, नवी मुंबई यांच्या नावाचे बिल पथकातील अधिकार्‍यांना दाखविले. मात्र पुणे विभागाला माहिती देणारा खबर्‍या अतिशय अचूक माहिती देण्यात वाकबदार असल्याने पथकाने कंटेनरच्या चालकावर विश्‍वास न ठेवता मागील बाजूचे सील तोडून वाहनाची तपासणी केली असता त्याच्या हौद्यात गोवा येथे उत्पादीत झालेल्या रॉयल ब्लू माल्ट कंपनीच्या 180 मिली लिटर व्हिस्कीच्या 38 हजार 352 सिलबंद बाटल्या (799 बॉक्स) व किंग फिशर स्ट्राँग बिअरच्या 500 मिली लिटरच्या 2 हजार 304 बाटल्या (96 बॉक्स) आढळून आले.


पथकाने तत्काळ कंटेनरचा चालक सूर्यकुमार रामचंद्र शिरसाट (वय 35, रा.विलेपार्ले (पूर्व), मुंबई) याला ताब्यात घेवून आयशर कंपनीचा सहाचाकी कंटेनर (क्र.एम.एच.04/एच.डी.8892) जप्त केला. पुणे व संगमनेर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केलेल्या या संयुक्त कारवाईत चोरट्या दारुसह एकूण 69 लाख 13 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी कंटेनरच्या चालकावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम 65 (अ), (ई), 81, 83, 90, 103 व 108 सह भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 468 व 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे दुय्यम निरीक्षक शहाजी गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या कारवाईने दारुची चोरटी वाहतूक करणार्‍यांचे धाबे दणाणले असून उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईचा प्रामाणिकपणे सखोल तपास केल्यास दारुची तस्करी करणारी टोळी उघड होण्याची शक्यता आहे. मात्र या विभागाचा आजवरच्या कारवायांचा इतिहासा लक्षात घेता असे काही घडेल याबाबत साशंकता आहे.

Visits: 114 Today: 1 Total: 1596526

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *