अवकाळीने वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
बुधवारपासून (ता.1) सुरू झालेल्या अवकाळी पावसाने शेतीची अक्षरशः दाणादाण उडवून दिलेली असताना वीटभट्टी व्यावसायिकांचेही मोठे नुकसान केले आहे. यामुळे या व्यवसायावर गुजराण करणार्या संगमनेर तालुक्यातील अनेक कुटुंबांवर आणि कामगारांसमोर आर्थिक संकट उभे राहणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून वीटभट्टी व्यावसायिकांनी शासनाकडे विमा धोरण आखण्याची मागणी केलेली आहे. परंतु, शासनाने साधी दखल सुद्धा घेतली नाही. शिवाय विमा कंपन्यांकडेही विचारणा केली असता त्यांनी कोणतेही धोरण नसल्याचे सांगितले. यामुळे लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह होणार्या व्यवस्याकडेच शासन दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी जगावे कसे असा सवाल केला आहे. त्यातच एकामागून एक संकटे येत असल्याने व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत आहे. विशेषकरुन कुंभार समाजातील वीटभट्टी व्यावसायिकांस विटा बनविण्यास लागणार्या मातीवरील रॉयल्टी माफ असताना स्थानिक अधिकारी बळजबरीने रॉयल्टी भरून घेतात. त्यामुळे शासनाने आमच्या मागण्यांचा विचार करुन नुकसान भरपाई द्यावी आणि लवकरात लवकर विमा धोरण आखावे अशी मागणी संगमनेर तालुक्यातील वीटभट्टी व्यावसायिकांनी केली आहे.
