पत्नीच्या दबावातून पतीने केली आत्महत्या! सासर्‍याच्या तक्रारीवरुन सूनेच्या विरोधात घारगावात गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, घारगाव
ऐन भाऊबीजेच्या दिनी माहुलीच्या पाझर तलावात जीव देणार्‍या तरुणाच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सदर तरुणाने आपल्या कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर येत असतानाच आत मयताच्या पित्याने आपल्या सूनेवर गंभीर आरोप करीत मुलाच्या आत्महत्येस तिच जबाबदार असल्याचे सांगत सूनेविरोधातच आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन घारगाव पोलिसांनी मृत तरुणाच्या पत्नीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पतीच्या मृत्यूस पत्नीच कारणीभूत असल्याची गेल्या काही दिवसांतील ही पहिलीच घटना समोर आल्याने अवघ्या पठारभागात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार गेल्या शनिवारी (ता.6) भाऊबीजेच्या दिवशी अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड प्रकल्पाजवळ राहणारा तरुण गणेश तुकाराम घोडेकर (वय 31) हा नातेवाईकांना भेटून येतो असे सांगत घरातून बाहेर पडला. त्यानंतर त्याच दिवशी तो खंदरमाळवाडी नजीकच्या माहुली येथील शंकर नाथा वाकचौरे यांच्या घरी आला व काही काळ तेथे थांबून कामाला जातो असे सांगून तेथून निघून गेला. त्यानंतर तीन दिवसांनी मंगळवारी (ता.9) सकाळी शंकर वाकचौरे यांच्या घरापासून शंभर फुट अंतरावरील माहुलीच्या पाझर तलावात त्या तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याने काहींनी पाहील्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील फौजफाट्यासह घटनास्थळी हजर झाले. कायदेशीर सोपस्कार आटोपल्यानंतर मयत तरुणाचा मृतदेह शवविच्छेनासाठी संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात पाठविल्यानंतर तो त्याच्या नातेवाईकांकडे देण्यात आला. या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

या घटनेला अवघे 36 तास उलटायच्या आतच मयत तरुणाचे वडील तुकाराम बाबुराव घोडेकर (वय 65) यांनी बुधवारी (ता.10) घारगाव पोलीस ठाण्यात येवून आपल्या मुलाच्या मृत्यूस त्याची पत्नीच जबाबदार असल्याचे पो.नि.पाटील यांना सांगितले. त्याबाबतची सविस्तर माहितीही त्यांनी यावेळी दिली. त्यानुसार मयत तरुण गणेश व माया या दोहींचा विववाह झाल्यापासूनच त्याची पत्नी पैशांच्या कारणावरुन सतत त्याच्याशी भांडत होती, त्यातून त्या दोघात नेहमीच वादावादी होत. त्यातच गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्या पत्नीने घटस्फोटासाठी एकसारखा तगादा लावला होता. त्यामुळे तो मानसिक दडपणात आल्याचे दाखल फिर्यादीत म्हंटले आहे.

सततची भांडणं आणि घटस्फोटाचा तगादा यामुळे मानसिक संतुलन बिघडलेल्या गणेशने वैतागून भाऊबीजेच्या दिवशी नातेवाईकांच्या घरी जाण्याचा बहाणा करुन घर सोडले ते जीव देण्याच्या इच्छेनेच आणि तो माहुली येथे आला. तेथे राहणारे त्याचे नातेवाईक शंकर नाथा वाकचौरे यांच्याकडे काही वेळ घालविल्यानंतर त्याने ‘कामाला जातो’ असे सांगत त्यांचे घर सोडले व तेथून अवघ्या शंभर फुट अंतरावर असलेल्या पाझर तलावात उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली. आपला मुलगा नातेवाईकांना भेटण्यासाठी गेला आहे असे समजून त्याचे कुटुंबिय, तर आपल्याकडे आलेला पाहुणा पुन्हा घरी गेल्याचे समजून शंकर वाकचौरे निश्चिंत राहीले. मात्र गेल्या मंगळवारी (ता.9) सकाळीच माहुलीच्या पाझर तलावात अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगत असल्याचे परिसरातील काहींनी पाहील्यानंतर जवळच राहणार्‍या वाकचौरे यांनीही तेथे जावून पाहिल्यानंतर हा दोन दिवसांपूर्वी आपल्या घरी आलेला पाहुणा असल्याचे सांगितले.

वरील आशयाच्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी मयताची पत्नी माया हिच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 306 नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. या वृत्ताने माहुलीसह संपूर्ण पठारभागात एकच खळबळ उडाली आहे. सात जन्म एकमेकांच्या सोबतीने राहू अशी वचने देवून विवाहबद्ध झालेल्या या जोडप्यात सुरुवातीपासून वादावादी सुर झाली आणि त्याचा शेवट मानसिक स्वास्थ बिघडलेल्या पतीच्या आत्महत्येत झाल्याने हळहळही व्यक्त झाली. पत्नीच्या मानसिक दबावातून चक्क पतीनेच आपले जीवन संपवण्याची अलिकडच्या काळातील ही पहिलीच घटना समोर आल्याने तालुक्यात खळबळही उडाली आहे. घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धिरज राऊत अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणात अद्याप मयताच्या पत्नीला अटक करण्यात आलेली नाही.

Visits: 115 Today: 1 Total: 1098428

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *