तिळापूरमध्ये लाळसदृश्य आजाराने जनावरांच्या मृत्यूचे तांडव तीन गायींच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले

नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी तालुक्यात लाळसदृश्य आजाराने अनेक पाळीव जनावरांचे बळी गेल्याची घटना घडली आहे. गेल्या 15 दिवसांत एकट्या तिळापूर गावात 45 हून अधिक गायींसह, वासरे, शेळ्या आणि बोकड या पाळीव प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्‍यांसमोर जनावरांचा मृत्यू होत असून तेही हतबल झाले आहेत. ऐन दिवाळीत पशुपालक शेतकर्‍यांवर संकट ओढवलं आहे. मोठ्या कष्टाने सांभाळलेली जनावरे डोळ्यासमोर जीव सोडत असल्याने या परिसरातील पशुपालक धास्तावले आहेत.

तिळापूर गावातील अनेक शेतकर्‍यांच्या गायी दगावल्या आहेत. शेतकर्‍यांना शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूग्ध व्यवसाय हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांकडे गायींचे गोठे आहेत. मात्र गावात गायींच्या मृत्यूचे तांडव सुरू आहे. तसंच अनेक शेतकर्‍यांच्या गाई गंभीर आजारी असल्याने शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

जिल्हा पशुसंवर्धक उपायुक्त सुनील तुंबारे यांनी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांसह तिळापूर गावात भेट दिली. लाळसदृश्य हा आजार असून आजाराचे नेमकं निदान व्हावं यासाठी तीन गायींच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.

Visits: 117 Today: 1 Total: 1105894

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *