अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जिल्हा प्रशासनाला पडला विसर तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यावर निधी टाकण्याची होतेय मागणी


नायक वृत्तसेवा, राहाता
राज्य सरकारने खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने पिकांच्या नुकसानीपोटी मदतीची घोषणा केली आहे. जिल्ह्यासाठी जवळपास तीनशे कोटीचा निधीही दिल्याचा शासन निर्णय निघाला आहे. मात्र त्यानंतर जवळपास दीड महिना उलटला तरी शेतकर्‍यांच्या खात्यावर या रकमा जमा न झाल्याने जिल्हा प्रशासनाला याचा विसर पडला की काय अशी चर्चा शेतकर्‍यांमधून होत आहे. प्रशासनाने तातडीने हा निधी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी होत आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परतीच्या पावसाने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदतही जाहीर केली. चार महिने झाले मात्र शेतकर्‍यांना अद्याप ही मदत मिळालेली नाही. राज्य सरकारने जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी जवळपास तीनशे कोटी रुपयांचा निधी दिल्याचा शासनादेश काढलेला आहे हा आदेश निघून जवळपास दीड महिना उलटून गेला आहे.


मात्र अद्याप नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यावर एक छदामही जमा झालेला नाही. जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र दप्तर दिरंगाईमुळे अद्यापही निधीचे वाटप झालेले नाही. खरीप पिकांचे प्रचंड नुकसान होऊन चार महिने होऊन गेले आहेत. मात्र अद्याप मदत न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांना प्रंचड मनःस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने हा निधी शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *