शनिशिंगणापूरात ‘लटकू बंद’ मोहिमेचा बार फुसका त्रास पुन्हा सुरू झाल्याने भाविकांमधून नाराजीचा सूर
नायक वृत्तसेवा, नेवासा
शनिशिंगणापूर पोलिसांनी दीड महिन्यापूर्वी हाती घेतलेल्या ‘लटकू बंद’ मोहिमेचा बार फुसका निघाला आहे. दिवाळी सुट्टीच्या निमित्ताने रस्त्यावर व गावात चारशेहून अधिक लटकूंचा त्रास पुन्हा सुरू झाल्याने, भाविकांमधून नाराजीचा सूर वाढत चालला आहे.
शनिभक्तांच्या वाढत्या तक्रारी व रस्त्यात अडवणुकीमुळे वाहतुकीत होत असलेली अडचण लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागूल यांनी 19 सप्टेंबर रोजी गावातील सर्व वाहनतळ मालक व व्यावसायिकांची बैठक घेऊन ‘लटकू बंद’च्या सूचना दिल्या. पोलिसांनी विशेष पथक तयार करून कारवाई मोहीम सुरू केल्याने सर्व लटकू हद्दपार झाले होते. भाविक व परिसरातील ग्रामस्थांनी याचे स्वागत केले होते.
दिवाळी सुटीच्या निमित्ताने सध्या शनिदर्शनासाठी गर्दीचा ओघ वाढला आहे. या संधीचा फायदा घेत सर्व व्यावसायिकांनी पोलिस कारवाईला न डगमगता चारशेहून अधिक ‘लटकूं’ना पुन्हा रस्त्यावर सक्रिय केले आहे. सध्या शिंगणापूर ते राहुरी व शिंगणापूर ते घोडेगाव मार्गावर मोटारसायकलवरील दोनशे ‘लटकू’ कार्यरत झाले. गावात रस्ता अडवून पूजा साहित्याची सक्ती सुरू झाली आहे. चक्क पोलीस ठाण्यासमोर हा प्रकार होत असताना, आठ दिवसांत एकही कारवाई झाली नाही, हे विशेष.
भाविकांच्या वाहनांचा पाठलाग व अडवणूक सुरू झाली असली, तरी लवकरच ‘लटकूं’चा बंदोबस्त केला जाईल. अधिक पोलिस कर्मचारी मिळाल्यानंतर दोन तपास नाकी व फिरती गस्त करणार आहे.
– सचिन बागूल (सहाय्यक पोलीस निरीक्षक)
राहुरी व सोनईपासून वाहनांचा पाठलाग केला जातो. पूजा साहित्याची सक्ती केली जाते. त्यांचे ऐकले नाही तर दमदाटी व शिवीगाळ केली जाते.
– रूपेशकुमार पटेल (बडोदा-गुजरात)