धनगंगा अपहार प्रकरणातील तिघा फरार आरोपींना अटक! सहा संचालकांचा अजूनही थांगपत्ता नाही; व्यवस्थापकासह चौदा संचालक यापूर्वीच दोषी..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील घुलेवाडी येथील धनगंगा बिगरशेती ग्रामीण पतसंस्थेत सुमारे चार कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार पाच वर्षांपूर्वी समोर आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संस्थेच्या सहा संचालकांसह तिघे कर्मचारी फरार झाले होते, तर अध्यक्ष, उपाध्यक्षांसह बारा संचालक, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार व्यवस्थापक सचिन कवडे व शिपाई सोमनाथ राऊत यांना अटक झाली होती. फरार आरोपींचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी हाती लागलेल्या सोळा जणांविरोधात दोषारोपपत्रही दाखल केले होते, गेल्याच महिन्यात या खटल्याचा निकाल समोर येवून यातील शिपायाची निर्दोष मुक्तता झाली तर उर्वरीत पंधराजणांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता या प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून हुलकावणी देणारे तिघे कर्मचारी पोलिसांच्या हाती लागले असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणात अद्यापही संस्थेचे सहा संचालक फरार असून त्यात तिघा महिलांचा समावेश आहे.
संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडीत धनगंगा बिगरशेती ग्रामीण सहकारी पतसंस्था आहे. या संस्थेत सन 2006 सालापासून सचिन कवडे हा व्यवस्थापक म्हणून काम करतो. 2009 पासून त्याने आपल्या पदाचा दुरुपयोग करुन संगणक प्रणालीचा गैरवापर करीत व रोजनिशीला खोट्या व बनावट नोंदी करुन मोठा आर्थिक गैरव्यवहार करण्यात सुरुवात केली. पाच वर्षांपूर्वी सन 2017 मध्ये संस्थेचे वैधानिक लेखापरीक्षक अजय राऊत यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत सहकार खात्याला माहिती दिली व त्यांच्याच आदेशाने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुसार संस्थेचा व्यवस्थापक सचिन बजरंग कवडे याने 30 सप्टेंबर, 2009 पासून पुढील आठ वर्षांच्या कालावधीत आपल्या पदाचा व संगणक प्रणालीचा गैरवापर केला. या कालावधीत त्याने बनावट प्रिंट काढून सुट्टीच्या दिवशी संस्थेच्या रोजनिशीत खोट्या नोंदी करुन बनावट कर्जप्रकरणं तयार केली. बोगस पावत्या तयार करुन कर्जरोख्यांवर खोट्या सह्या केल्या. ठेवीदारांच्या पावत्या नावे टाकून त्याची रक्कम स्वतःच्या व आपल्या मर्जीतील इतरांच्या खात्यात जमा केल्या व नंतर नावे टाकून त्या खात्यातील रकमा काढून घेतल्या. संचालक मंडळाच्या मंजुरीशिवाय परस्पर आपल्या नावावर विनातारण कर्ज प्रकरणं मंजूर करुन संस्थेतून लाखो रुपयांचे कर्ज घेतले. याबाबत वैधानिक लेखापरीक्षक अजय राऊत यांनी 17 ऑक्टोबर, 2017 रोजी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार व्यवस्थापक कवडे याने संचालक मंडळ व सहकारी कर्मचार्यांशी संगनमत करुन सन 2009 ते 2017 या कालावधीत 3 कोटी 91 लाख 61 हजार 254 रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने पूर्ण करीत अपहार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार, संस्थेचा व्यवस्थापक सचिन कवडे, चेअरमन रंगनाथ काशिद, व्हाईस चेअरमन किरण जाधव, संचालक शांताराम राऊत, आनंदा पानसरे, विक्रम गुंजाळ, प्रवीण भावसार, राजेंद्र गायकवाड, मच्छिंद्र ढमाले, भिकाराम राऊत, अण्णासाहेब नवले, बाळासाहेब ढमाले, अशोक पानसरे, बाबासाहेब राऊत व अलका काशिद या चौदा संचालकांसह शिपाई सोमनाथ राऊत यांना अटक केली होती. तर संचालक मंडळाचे सदस्य महादू अरगडे, बेबी सोनवणे, सुनंदा सातपुते, सचिन काळे, नादेव घोडे, जिजाबाई पांडे यांच्यासह संस्थेचा लिपीक सचिन सुखदेव सोनवणे, लेखनीस विनायक दामोदर कांडेकर व रोखपाल शहनाज मेहबूब सय्यद हे तिघे कर्मचारी मात्र फरार झाले होते.
त्यानंतरच्या पोलीस तपासांत फरार आरोपींचा शोध न लागल्याने पोलिसांनी अपहार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सचिन कवडे याच्यासह उर्वरीत पंधरा जणांविरोधात संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. गेल्या महिन्यात 6 मे रोजी या प्रकरणाचा निकाल लागला. त्यात व्यवस्थापक कवडे व अध्यक्ष रंगानाथ काशिद या दोघांना दहा वर्षांचा सश्रम कारावास तर अन्य चौदा संचालकांना प्रत्येकी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणातून संस्थेचे शिपाई सोमनाथ राऊत यांची मात्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. या खटल्याचा निकाल लागेपर्यंत या प्रकरणात फरार असलेले सहा संचालक व तिघे कर्मचारी मात्र पोलिसांना शेवटपर्यंत सापडले नाहीत.
आता या खटल्याचा निकाल लागून महिन्याचा कालावधी उलटलेला असताना गेल्या 17 ऑक्टोबर, 2017 पासून फरार असलेले धनगंगा पतसंस्थेचे तिघे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यात संस्थेचा लिपीक सचिन सुखदेव सोनवणे, रोखपाल शहनाज मेहबूब सय्यद व लेखनीस विनायक दामोदर कांडेकर या तिघांना आता अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता संगमनेरचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश वाय. एच. अमेटा यांनी त्या तिघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात संस्थेचे सहा संचालक अद्यापही फरार असून त्यात तिघा महिला संचालकांचा समावेश आहे. धनगंगा पतसंस्था आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात 20 संचालकांसह 25 जणांवर गुन्हे दाखल झाले होते, आत्तापर्यंत त्यातील 19 जणांना अटक झाली असून 16 जणांचा न्यायालयीन निवाडाही झाला आहे.
गेल्या महिन्यात 6 मे रोजी या खटल्याचा निकाल लागला. त्यातून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी आरोपी सचिन कवडे व तत्कालीन अध्यक्ष रंगनाथ काशिद याला आर्थिक घोटाळ्याच्या विविध कलमांसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याखाली दोषी धरुन दहा वर्ष सश्रम कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली होती, तर उर्वरीत 13 संचालकांना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्याच्या (मोक्का) कलम 3 नुसार प्रत्येकी दोन वर्ष कारावास, पाच हजार रुपये दंड, तो न भरल्यास सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली होती. आता पोलिसांनी या प्रकरणात आणखी तिघांना अटक केल्याने त्यांचे स्वतंत्र आरोपपत्र न्यायालयात दाखल होणार आहे.