कचरा डेपोचे ‘नंदनवन’ करणार्‍या मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांची बदली! पाच वर्षांच्या कारकीर्दीत सामान्य संगमनेरकरांच्या मनातही मिळविले स्थान..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविडच्या संकटाने संगमनेरकरांच्या सेवेची दुप्पट संधी मिळालेल्या मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांची अखेर बदली झाली आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. या कालावधीत त्यांनी सतत वादग्रस्त ठरलेल्या पालिकेच्या कचरा डेपोला दुर्गंधी मुक्त करण्यासह शहर विकासाच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावली. आपल्या कर्मचार्‍यांच्या पाठीशी ठाम उभा राहणारा अधिकारी अशी ओळखही त्यांनी निर्माण केली. शहराचा गावगाडा हाकतांना सत्ताधारी आणि विरोधक यांच्याशी प्रसंगानुरुप संवाद साधीत त्यांनी आपल्यातील चपखलपणाही वेळोवेळी सिद्ध करुन दाखवला. संगमनेरकरांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आता त्यांची राहुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी बदली झाली आहे, त्यांच्या जागी अजून नवीन मुख्याधिकार्‍यांची नियुक्ति नसल्याने पुढील काही दिवस ते संगमनेरात राहणार आहेत.


18 जून 2016 रोजी डॉ.सचिन बांगर यांनी संगमनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाची सूत्र स्वीकारली होती. त्यावेळी संगमनेर खुर्दमधील पालिकेच्या कचरा डेपोवरुन पालिका विरुद्ध संगमनेर खुर्दची कचरा डेपो हटाओ कृती समिती असा जोरदार संघर्ष सुरु होता. अशा स्थितीत येथील राजकीय व सामाजिक पार्श्‍वभूमी माहिती नसतांनाही त्यांनी आंदोलकांशी वारंवार चर्चा करीत त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत सतत आग्रही भूमिका घेवून कचरा डेपो अन्यत्र हलविण्याऐवजी आहे त्या ठिकाणीच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन दुर्गंधी नष्ट करण्याची रुजवात केली. सुरुवातीला त्यांचे प्रयत्न वेळ मारुन नेण्याचा प्रयोग असल्याचीही चर्चा झाली, मात्र कर्तृत्त्वान माणसं लोक काय म्हणतात याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. त्यानुसार ते आपल्या ध्येयाच्या दिशेने काम करीत राहीले आणि त्याचे फळ कित्येक वर्ष वादात राहीलेला कचरा डेपो दुर्गंधीमुक्त होण्यात झाला.


संगमनेरातून दररोज घंटागाड्यांद्वारे 25 मेट्रीक टन घनकचरा संकलित केला जातो. त्यातील 15 मेट्रीक टन कचरा ओल्या स्वरुपाचा असतो. संगमनेरच्या कचरा डेपोत दररोज पाच मेट्रीक टन कचर्‍यावर प्रक्रीया केली जाते व त्यातून बायोगॅसची निर्मिती करुन दररोज 150 किलो वॅट वीज तयार होते. या विजेवरच कचरा डेपोतील सर्व यंत्र व तेथील दिवे सुरु असतात. येथे तयार होणारे खत जमिनीसाठी अतिशय पोषक असल्याने संगमनेर नगरपालिकेच्या कंपोस्ट खताला शेतकर्‍यांमधून मोठी मागणी आहे. कधीकाळी प्रचंड दुर्गंधीमूळे येथील डेपोला स्थानिकांसह प्रवाशांचाही मोठा विरोध होता. मात्र आज येथील परिस्थिती पूर्णतः बदलली असून हा परिसर केवळ दुर्गंधी मुक्त नव्हेतर कौंटुंबिक सहलीचे ठिकाण म्हणूनही समोर आले आहे. याचे संपूर्ण श्रेय मुख्याधिकारी डॉ.बांगर यांचे आहे.


याशिवाय स्वच्छ भारत अभियानातही त्यांनी अतशय प्रभावी काम केले. या कालावधीत त्यांच्याकडे संगमनेरसह अकोले, राहाता आणि राहुरी नगरपालिकांचाही अतिरीक्त पदभार होता. तेथेही त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. गेल्या पाच वर्षांच्या काळात शहर विकासाच्या दृष्टीने भूयारी गटार योजना असो अथवा शहराची वाढीव पाणी पुरवठा योजना. यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेवून संगमनेरसाठी वाढीव निधी मिळविण्यातही मोठी भूमिका बजावली. स्वच्छ व हरीत शहराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने माझी वसुंधरा अभियानातही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. बुधवारी (ता.11) त्यांची राहुरी नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी बदली झाल्याचे आदेश त्यांना प्राप्त झाले. मात्र त्यांच्या रिक्त जागेवर अद्याप कोणाचीही वर्णी लागलेली नसल्याने पुढील काही दिवस त्यांचा संगमनेरातच मुक्काम असणार आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी संगमनेरच्या विकासासाठी भरीव काम करुन संगमनेरकरांच्या मनात आपले स्थान निर्माण केल्याने त्यांच्या बदलीचे वृत्त समजताच अनेकांनी त्यांची भेट घेवून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Visits: 145 Today: 1 Total: 1106443

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *