निर्यातबंदी करून कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा बळी दिला ः डॉ.नवले

निर्यातबंदी करून कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा बळी दिला ः डॉ.नवले
… तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा भारतीय किसान सभेचा इशारा
नायक वृत्तसेवा, अकोले
पुरवठा साखळीतील अडचणीमुळे कांद्याची तात्पुरती टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, भाव वाढले तर याचा बिहारच्या निवडणुकीत फटका बसू शकतो. असा विचार करून स्वार्थी राजकारणासाठीच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून देशभरातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा बळी दिला आहे, असा आरोप भारतीय किसान सभेने केला आहे. या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ.अजित नवले यांनी दिला आहे.


केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे कांद्याची मागणी घटून भाव कोसळण्याची शक्यता आहे. म्हणून किसानसभेने या बंदीला विरोध केला आहे. यासंबंधी डॉ. नवले यांनी सांगितले की, ‘बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांचे कोट्यवधींचे नुकसान होणार आहे. अगोदरच कोरोना महामारीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अलीकडेच केंद्र सरकारने कांद्यासह पाच प्रकारचे शेतमाल आवश्यक वस्तू कायद्यातून वगळले असल्याची घोषणा केली होती. भाजप समर्थक शेतकरी संघटनांनी सरकारच्या या घोषणेचे तोंड भरून कौतुक करताना कांदा उत्पादकांना आता सोन्याचे दिवस येतील, अशा प्रतिक्रिया दिल्या होत्या. मोदी सरकारने तीन अध्यादेश काढून शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने स्वातंत्र्य बहाल केले असे निष्कर्षही काही शेतकरी संघटनांनी काढले होते. प्रत्यक्षात मात्र मोदी सरकारच्या त्या निर्णयाचे पडघम हवेतून विरण्यापूर्वीच कांद्यावर निर्यातबंदी लादण्यात आली आहे. मोदी सरकारचा शेतकरीद्रोही चेहरा यामुळे पुन्हा एकदा उघड झाला आहे.’


सध्या कांद्याचे भाव का वाढले आहेत, हे सांगताना नवले म्हणाले, ‘या हंगामात कांद्याचे देशात विक्रमी उत्पादन झाले होते. सप्टेंबर महिन्यात पुरवठा साखळीतील अडचणींमुळे कांद्याचे भाव थोडे वाढले होते. मात्र ही वाढ तात्पुरत्या स्वरूपाची होती. आंध्र प्रदेश व कर्नाटकात उत्पादित होणारा कांदाही बाजारात येणार आहे. अशा परिस्थितीत कांद्याच्या टंचाईची गंभीर समस्या उत्पन्न होण्याची नजीकच्या काळात शक्यता दिसत नसताना केवळ बिहार निवडणुकीच्या स्वार्थी राजकारणासाठी कांद्यावर निर्यातबंदी लादून देशभरातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा मोदी सरकारने बळी दिला आहे. या निर्णयाच्या विरोधात कांदा उत्पादक शेतकर्‍यांना बरोबर घेत तीव्र आंदोलन उभारले जाईल,’ असा इशाराही डॉ.नवले यांनी दिला आहे.

Visits: 12 Today: 1 Total: 116847

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *