नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्यांमध्ये संभाजी ब्रिगेडचे वृक्षारोपण
नगर-मनमाड महामार्गावरील खड्ड्यांमध्ये संभाजी ब्रिगेडचे वृक्षारोपण
महामार्गाची अक्षरशः चाळण झाल्याने संबंधित विभागाचे वेधले लक्ष
नायक वृत्तसेवा, राहाता
वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार्या नगर-मनमाड महामार्गाची सध्या अक्षरशः चाळण झालेली आहे. यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना अपंगत्व तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडने मंगळवारी (ता.15) मोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन गांधीगिरी केली. आता तरी संबंधित विभागाने जागे होत याकडे गांभीर्याने लक्ष देऊन महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे.
याबाबत जागतिक प्रकल्प विभागाचे सहाय्यक स्थापत्य अभियंता हरीश गर्जे यांना निवेदन देण्यात आले आहे. सदर निवेदनात म्हंटले आहे की, या महामार्गाचे काम दर्जेदार न झाल्यामुळे पावसाळ्यात मार्गावर नेहमीच मोठमोठे खड्डे पडतात. त्यामुळे या मार्गाची ओळख ‘खड्डेयुक्त मार्ग’ अशी झाली आहे. या दुरावस्थेमुळे अनेक निष्पाप नागरिकांना अपंगत्व प्राप्त झाले आहे तर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच या मार्गावर शिर्डी हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र आहे. तर मोठ्या प्रमाणात माल वाहतूकही होते.
परंतु या रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. यातून अनेकदा छोटे-मोठे अपघात घडत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक दशरथ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गाजवळील कालव्यालगत मोठ्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करुन गांधीगिरी करण्यात आली. यापुढे अपघातांची सर्वस्वी जबाबदारी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व जागतिक प्रकल्प विभागाची असेल, असा निर्वाणीचा इशारा देऊन तात्काळ मार्गाची दुरुस्ती करावी. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभे करून जनहित याचिका दाखल करण्यात येईल असे निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष साहेबराव कुदळे, तालुका उपाध्यक्ष अजित गवांदे, नवनाथ नळे, राजेंद्र मुळे, प्रदीप तांदळे, रोहन जगताप, किरण जेजूरकर तसेच मराठा सेवा संघाचे शरद निमसे आदिंच्या सह्या आहेत.