साईभक्तांची केवळ दहा रुपयात होणार निवासाची सोय भक्तांच्या संभाव्य गर्दीमुळे संस्थानकडून खास व्यवस्था


नायक वृत्तसेवा, शिर्डी
नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील अनेकजण सुट्ट्यांसाठी बाहेर पडले आहेत. राज्यातील पर्यटन स्थळांसह धार्मिक स्थळांवरही मोठी गर्दी होत आहे. शिर्डीतही दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. शिर्डीतील वाढती गर्दी लक्षात घेता साईबाबा संस्थानकडून खास व्यवस्था केली जात आहे. शिर्डीतील भक्तनिवास भाविकांनी पूर्ण भरलं, तर साईभक्तांना त्याच ठिकाणी राहण्याची तात्पुरती व्यवस्था साईबाबा संस्थानकडून करण्यात आली आहे. यामुळे साईभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नवीन वर्षाचं स्वागत होत असताना अनेकजण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शिर्डीत साईंच्या चरणी दर्शनासाठी येत असतात. केवळ राज्यातूनच नाही, तर देशभरातून अनेक साईभक्त दर्शनासाठी शिर्डीत दाखल होतात. भाविकांच्या सोयीसाठी साईबाबा संस्थान सज्ज झालं असून भक्तांसाठी तात्पुरती राहण्यासाठी सोय करण्यात आली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी येणार्‍या भाविकांनी भक्त निवास संपूर्ण भरण्याची शक्यता आहे. भक्त निवास पूर्णपणे भरल्यानंतर भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी भक्त निवासाजवळ एका मोठ्या खुल्या जागेवर मंडप उभारण्यात आला आहे. त्या मंडपात जवळपास एक हजार भक्त राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

नववर्षासाठी होणारी साईभक्तांची गर्दी पाहता भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अतिशय कमी पैशात भक्तांसाठी राहण्याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. पाच रुपयात गादी, तर पाच रुपयात चादर इथे तात्पुरत्या राहण्याच्या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याचबरोबर 31 डिसेंबरला रात्रभर मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साईबाबा संस्थानकडून हा निर्णय घेण्यात आला असून भाविक रात्रभर इथे साईंच्या चरणी दर्शन घेऊ शकतात.

Visits: 106 Today: 1 Total: 1100428

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *