शेळकेवाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

शेळकेवाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कुरकुंडी येथील तौफिक बशीर चौगुले या शेतकर्‍याच्या तीन शेळ्या बिबट्याने ठार केल्याची घटना गुरुवारी (ता.5) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे. दिवसेंदिवस पठारभागात बिबट्यांचे हल्ले वाढतच असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कुरकुंडी येथील तौफिक चौगुले यांची अकलापूरच्या शेळकेवाडी शिवारात शेती आहे. दरम्यान, चौगुले हे गुरुवारी आपल्या शेताजवळच शेळ्या चारत होते. याचवेळी गंधारीच्या झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेळ्यांवर हल्ला केला. हे पाहून चौगुले यांनी जोरजोराने आरडाओरडही केला. त्यामुळे आजुबाजूला असलेल्या नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. मात्र तोपर्यंत बिबट्याने तिन्ही शेळ्यांचा फडशा पाडला होता. तीन शेळ्यांपैकी एक शेळी बिबट्याने पळून नेली होती. त्यानंतर चौगुले यांनी घटनेची माहिती वन विभागाला दिली.

शुक्रवारी सकाळी वन विभागाचे दिलीप बहिरट, बाळासाहेब वैराळ यांनी घटनास्थळी जावून मृत शेळ्यांचा पंचनामा केला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून साकूर, बिरेवाडी, शिंदोडी आदी गावांमध्ये बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घालत पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस पठारभागात बिबट्यांची संख्या वाढत असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

 

Visits: 135 Today: 1 Total: 1101252

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *