कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे आयोजन! राज्यात नावाजलेल्या वक्त्यांकडून होणार विचारांची उधळण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर व परिसरातील रसिकांची वैचारिक भूक शमविणार्‍या कवी अनंत फंदी व्याख्यानमालेचे यंदा आयोजन करण्यात आले आहे. सात दिवस चालणार्‍या या वैचारिक उत्सवात राज्यातील विविध क्षेत्रात नावाजलेल्या विचारवंतांचे विचार श्रवण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. 20 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत होणार्‍या या व्याख्यानमालेचा शुभारंभ आर्थिक पत्रकारितेतील मेरुमणी समजल्या जाणार्‍या हेमंत देसाई यांच्या व्याख्यानाने होणार असून ज्येष्ठ सिनेअभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या अनुभव कथनातून समारोप केला जाणार आहे. राज्यभरात गाजलेल्या या व्याख्यानमालेचे यंदा 44 वे वर्ष आहे.

गेल्या साडेचार दशकांपासून संगमनेरकरांना वैचारिक मेजवाणी देणार्‍या या व्याख्यानमालेत यंदा विविध विषयांना स्पर्श करणारे ख्यातनाम व्याख्याते हजेरी लावणार आहेत. शनिवार 20 नोव्हेंबर रोजी व्याख्यानमालेच्या शुभारंभाचे वक्ते म्हणून राज्यातील पत्रकारिता क्षेत्रात उत्तुंग काम करणारे हेमंत देसाई श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या क्षणाला पुढील वर्षी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत..’ या विषयावरील त्यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान संगमनेरकरांसाठी विशेष मेजवाणी ठरणार आहे.

रविवार 21 नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, लेखक व डॉ.होमी भाभा विद्यापीठाचे संचालक शैलेंद्र देवळाणकर यांचे ‘भारत आणि आंतरराष्ट्रीय राजकारण’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार 22 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ विचारवंत व लेखक दीपक करंजीकर यांच्या ‘जागतिक अफरातफर व त्याची पाळेमुळे’ या विषयावरील अभ्यासपूर्ण व्याख्यान होणार आहे. मंगळवार 23 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार, विश्लेषक आणि अभ्यासक श्रीरंग गोडबोले यांचे ‘दृकश्राव्य माध्यमे – आज आणि उद्या’ या विषयावरील व्याख्यान होणार आहे.

कला, साहित्य, नाट्य, संगित यासह विविध विषयांवरील अभ्यासकांचा दरवर्षी समावेश असणार्‍या कवी अनंत फंदी व्याख्यानमालेत यंदा गिरीभ्रमणाच्या क्षेत्रात हिमालया इतके उत्तुंग कार्य करणार्‍या, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त उमेश झिरपे यांच्याही व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार 24 नोव्हेंबर रोजी ‘हिमालयातील दिवस’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. यंदाच्या व्याख्यानमालेत विचारांचे विविध रंग उधळतांना आजवर 75 हजारांहून अधिक विवाह जुळवून त्यांच्या जीवनात सुखाची पालवी फुलविणार्‍या डॉ.गौरी कानिटकर यांचे ‘असे जुळतात विवाह.. अडथळे व गंमतीजमती’ या वेगळ्या विषयावरील व्याख्यानाचे गुरुवार 25 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार 26 नोव्हेंबर रोजी हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत शेकडो भूमिकांद्वारे मनामनात स्थान मिळविणार्‍या ज्येष्ठ सिनेअभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या ‘नाट्य व चित्रपट क्षेत्रातील माझे अनुभव’ या विषयावरील व्याख्यानाने यंदाच्या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. शनिवार दिनांक 20 ते शुक्रवार दिनांक 26 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी सात वाजता कवी अनंत फंदी नाट्यगृहात होत असलेल्या या व्याख्यानमालेचा संगमनेरकरांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कवी अनंत फंदी प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

Visits: 14 Today: 1 Total: 117719

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *