जीव मुठीत घेऊन केलेल्या प्रवासाने पुनर्जन्म झाल्याची अनुभूती! सोनईतील दर्शन औटीने सांगितली यूके्रनमधील थरारक कहाणी
नायक वृत्तसेवा, नेवासा
यूक्रेनमधील युद्धामुळे व्हिनितशिया वैद्यकीय महाविद्यालयाच्या तळघरात असताना 35 तास जीव टांगणीला होता. पोलंडच्या सीमेवर पोहोचलो; मात्र तेथे मोठी गर्दी असल्याने परत फिरलो. दुसर्या दिवशी रोमानियाची सीमा ओलांडताना जीव मुठीत घेऊन केलेल्या प्रवासाने, पुनर्जन्म झाल्याची अनुभूती आली, अशी अंगावर शहारे आणणारी कहाणी मूळ सोनई (ता.नेवासा) येथील मात्र शिक्षणासाठी यूक्रेनमध्ये अडकलेल्या दर्शन औटी या विद्यार्थ्याने सांगितली.
सोनईतील दर्शन युक्रेनमधील व्हिनितशिया वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. 23 फेब्रुवारीच्या रात्री रशिया-यूक्रेन युद्ध सुरू झाले. ही घटना समजताच संपूर्ण औटी परिवार चिंतेत पडला. मात्र, देवाचा धावा करणे एवढेच त्यांच्या हाती होते. दुसरीकडे, युद्ध सुरू झाल्याने व्हिनितशिया येथील तळघरात दर्शनसह केडगाव येथील अजिंक्य अशोक भापकर, पाथर्डी येथील दर्शन सतीश आंधळे व इतर पाचशे विद्यार्थ्यांनी आसरा घेतला होता. तेथे असताना लढाऊ विमानांची घरघर, धोक्याची घंटा म्हणून वाजत असलेला भोंगा काळजात धडकी भरवत होता. त्यानंतर बसने तेथील भारतीय विद्यार्थ्यांना रोमानिया सीमेच्या अलीकडे पंधरा किलोमीटरवर सोडण्यात आले. उपाशीपोटी, देवाचे नाव घेत पायी प्रवास सुरू झाला. उणे सात अंश तापमानात, रामाचा धावा करत आठ तासांत आंतरराष्ट्रीय सीमा गाठली. तेथे यूक्रेन सैन्यदलाने अश्रूधूर, पाण्याचे फवारे व हवेत गोळीबार करून अडवणूक करण्याचा प्रयत्न केला. हातापाया पडून अखेर सात तासांत सर्व विद्यार्थ्यांनी सीमा ओलांडली. रोमानिया देशाच्या बुचारेस्ट आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सुखरूप पोहोचल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला, असा थरारक अनुभव दर्शन याने सांगितला.
अमेरिकेत वास्तव्य करत असलेल्या अभिजीत अनिल होशिंग याने तातडीने भारतीय दूतावासातील राहुल श्रीवास्तव, हेमा रेड्डी-रचमले यांच्याशी संपर्क करून त्यांना भारतीय विद्यार्थ्यांची माहिती दिली. त्यानंतर होशिंग यांच्या प्रयत्नांतून बुधवारी (ता.2) भारतीय विमान उपलब्ध झाले आहे, असे दर्शन औटीने सांगितले.
एमबीबीएसचे समन्वयक नवदीप सिंग, शिक्षक सुशील व विकास हे दर तासाने संपर्क करून धीर देत होते. प्राचार्या अला यांचे सहकार्य झाले. रोमानियात अनेक सेवाभावी संस्थांनी नाश्ता, जेवण, फळे व पाणी दिले.
– अजिंक्य भापकर, केडगाव