अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या घटनेचा तपास संदीप मिटके करणार! दुर्घटनेवरून राजकीय टीका-टीपण्णी सुरू; तपासाअंतीच सत्य बाहेर येणार

नायक वृत्तसेवा, नगर
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीत 11 रुग्णांना जीव गमवावा लागल्याने राज्यभर हळहळ व्यक्त करण्यात आली. या दुर्घटनेवरून राजकीय टीका-टीपण्णीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तत्पूर्वी घटनेचे गांभीर्य पाहता याचा तपास श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

अहमदनगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयातील अतिदक्षता विभागास आग लागून 11 जणांनी जीव गमावला आहे. या घटनेवरुन संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त होत असताना राजकीय टीका-टीपण्णही सुरू आहे. आत्तापर्यंत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आपत्ती व्यस्थापन, मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार डॉ.सुजय विखे, सदाशिव लोखंडे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्‍हे, आमदार संग्राम जगताप, लहू कानडे, रोहित पवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, अन्पर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, संचालक डॉ. अर्चना पाटील, विभागीय आयुक्त नाशिक राधाकृष्ण गमे, पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडोदे, मुख्य अग्निशमन अधिकारी शंकर मिसाळ यांनी भेटी देऊन पाहणी केली आहे.

मात्र, रोज नवनवीन खुलासे होत असताना, रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात स्थायी अग्निशमन यंत्रणाच उपलब्ध नव्हती. अलीकडेच करण्यात आलेल्या फायर ऑडिटमध्ये ही गोष्ट रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे आता समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला होता. रुग्णांची संख्या वाढल्यानंतर त्याचेच अतिदक्षता विभागात रुपांतर करण्यात आलेले आहे. मात्र, हे करताना अग्निसुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले आहे. कोरोना काळात आगी लागण्याच्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात आले. अहमदनगरच्या या रुग्णालयाचेही ऑडिट करण्यात आले होते. महापालिकेच्या अग्निशामक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी यासंबंधी पाहणी करून अहवाल दिला होता. यामध्ये पथकाने काही त्रुटी दाखवून दिल्या होत्या. यात आगीच्या धोक्याची सूचना देणारी यंत्रणा (फायर अलार्म), आग लागलीच तर पाण्याचे फवारे फारण्याची सुविधा (स्प्रिकंलर), पाण्याचे पंप अशी स्थायी अग्निशमन यंत्रणा नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. त्याची तातडीने पूर्तता करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले.

याशिवाय जेथे घटना घडली, तेथे विजेच्या तारांचा गुंतायुक्त संच होता. तेथे शॉर्टसर्किट झाले असावे, तेथून ऑक्सिजनच्या पाइपने पेट घेऊन आग भडकत गेली असावी, असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग लागल्याचे लवकर लक्षात येण्यासाठी आणि ती अटोक्यात आणण्यासाठी तातडीने हालचाली करण्याची यंत्रणा हाताशी नसल्याने आग अटोक्यात आणण्यात अडचण आली असावी, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. कक्षात पीओपी केले होते. त्यामुळे धूर वाढत गेला. शिवाय ग्रील आणि खिडक्या पक्के बंद केलेले असून एकच दरवाजा आहे. त्यामुळेही बचाव कार्यात अडचणी आल्याचे अग्निशामक दलाच्या पथकांनी सांगितले. त्रुटींची दखल घेत पूर्तता केली असती तर दुर्घटना टाळता येऊ शकली, असती असे आता बोलले जाऊ लागले आहे. अर्थात नेमकं सत्य चौकशीतून समोर येईल. या पार्श्वभूमीवर नगर शहरात काम केलेले असलेले पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे या घटनेचा तपास सोपविण्यात आला आहे. यापूर्वी मिटके यांनी अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास केलेला आहे. त्यामुळे या घटनेचाही तपास त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Visits: 28 Today: 1 Total: 115873

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *