रेखा जरे खून प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे सुपा पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, नगर
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या खून प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची सहा पथके रवाना झाली आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असेही वरीष्ठ पोलीस अधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात अज्ञात दोन व्यक्तींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी (ता.1) रात्री आठच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे धारदार शस्त्राने रेखा जरे यांची गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आज, मंगळवारी पहाटे सुपा पोलीस ठाण्यात दोन व्यक्तींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी रेखा जरे यांची आई सिंधुबाई सुखदेव वायकर यांनी फिर्याद दिली आहे.

रेखा जरे, त्यांचा मुलगा, त्यांची आई तसेच त्यांची एक मैत्रीण पुण्यावरून काम उरकून अहमदनगरला येत असताना जातेगाव घाटात एक दुचाकी त्यांना आडवी आली. यावेळी या दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून रेखा जरे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. याचवेळी एकाने धारदार शस्त्र काढत जरे यांच्या गळ्यावर वार केला व हल्लेखोर निघून गेले. या हल्ल्यात जरे या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत जरे यांना त्यांच्यासोबत असलेल्यांनी कारमध्ये बसवले व कार अहमदनगरच्या दिशेने घेतली. सुपा टोलनाक्यावर एक रुग्णवाहिका भेटल्यावर त्यामध्ये रेखा जरे यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांचा तपास सध्या तीन दिशेने सुरू असून तपासासाठी सहा पथके रवाना करण्यात आली आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी याला दुजोरा दिला आहे.

जरे यांच्या सॅन्ट्रो कारला दुचाकी आडवी घालून त्यांच्या हुज्जत घालीत त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करणार्या दोघांपैकी एका संशयिताचे छायाचित्र नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने प्रसिद्ध केले असून संबंधित व्यक्तिबाबत कोणासही काही माहिती असल्यास त्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांनी केले आहे. खूनामागील नेमक्या कारणांचा अद्यापही उलगडा झालेला नसून पोलीस सर्व शक्यता पडताळून बघत आहेत. सदरचे प्रकरण ‘अन्य’ कारणाने घडले का? याचीही सखोल तपासी सुरु आहे. एलसीबीद्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्यक्तिबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी पो.नि.अनिल कटके (98702 21379), स.पो.नि.देशमुख (98907 41692) व पो.स.ई.गणेश इंगळे (88055 60100) यांना माहिती द्यावी.

