पहाट गाणी संगमनेरचे सांस्कृतिक वैभव ः थोरात पहाट गाणी कार्यक्रमाला संगमनेरकरांचा प्रचंड प्रतिसाद
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या 16 वर्षांपासून सादर होणारा पहाट गाणी हा कार्यक्रम म्हणजे संगमनेरचे सांस्कृतिक वैभव आहे. दिवाळीच्या फटाक्यांची जागा संगीताने घेतली पाहिजे अशी आमची भावना आहे. आपल्याच कुटुंबातली मुले इतक्या सुंदर रितीने कार्यक्रम सादर करून आपल्या जीवनात आनंद निर्माण करतात याचा मनापासून आनंद वाटतो असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
संगमनेर इतिहास संशोधन मंडळ आणि स्वरसंगम संगीत प्रसारक संस्था यांच्यावतीने आयोजित दिवाळी पहाट गाणी कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कांचन थोरात, प्रदीप शाह, इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष द्वारकानाथ राठी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. संतोष खेडलेकर यांच्या संकल्पनेतून सादर होणार्या दिवाळी पहाट गाणी कार्यक्रमात यावेळी सत्यजीत सराफ यांच्या संगीत संयोजनात विकास भालेराव, शीतल सराफ, अनुजा सराफ यांनी वेगवेगळ्या बाजाची हिंदी मराठी गाणी गायली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी हा कार्यक्रम निवडक रसिकांच्या उपस्थितीत सादर करून त्याचे समाज माध्यमांवर प्रसारण करण्यात आले होते. मात्र यावर्षी हा कार्यक्रम नेहमीप्रमाणे सर्वांसाठी खुला असल्याने संगमनेर आणि आजूबाजूच्या गावातील संगीत रसिकांनी यापूर्वीचे गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढीत कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती.
अजित गुंदेचा, श्रीकांत गडकरी, राजकुमार सस्कर, सौरभ गुंजाळ यांनी कार्यक्रमात सांगितिक साथ केली. देवीदास गोरे आणि अभिजीत खेडलेकर यांच्या पुढाकारातून तयार केलेल्या समन्वय समितीच्या माध्यमातून किसन हासे, मिलिंद औटी, श्याम कुलकर्णी, एस. एम. खेमनर, अण्णासाहेब काळे, अशोक गवांदे, शिवकुमार सस्कर यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण व्यवस्थापन बघितले. सीए. कैलास सोमाणी, राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य लाभले.