दिवाळीपूर्व आठवडे बाजारातही शुकशुकाट! पगारदारांची दिवाळी; शेतकरी व मजुरांना मात्र अजूनही पैशांची प्रतीक्षा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दिवाळीचा सण अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपलेला असतांनाही संगमनेरच्या बाजारपेठेत अद्यापही अपेक्षित गर्दी नाही. त्यातच आजच्या शनिवारचा आठवडे बाजार दिवाळीपूर्वीचा शेवटचा असल्याने संगमनेरच्या व्यापार्यांना मोठी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरल्याचे चित्र आज सकाळपासूनच संगमनेरातील विविध रस्त्यांवर दिसत आहे. गेल्या आठ दिवसांत शहरी भागातील ग्राहकांची तुरळक गर्दी बाजारपेठांत होती, मात्र संगमनेर साखर कारखाना, दूध संघ व अन्य काही खासगी आस्थापनांमधील कर्मचार्यांना अद्याप बोनस मिळालेला नसल्याने त्याचाच परिणाम बाजारपेठांमध्ये शुकशुकाट जाणवण्यात झाला आहे. सदरच्या रकमा सोमवारी खातेदारांच्या खात्यात जमा होण्याचा अंदाज असल्याने संगमनेरची बाजारपेठ त्यानंतरच फुलण्याचा अंदाज आहे.
किराणा व भुसार मालासह तेल-तुप, कापड, सुवर्ण अलंकारांची असंख्य दालने असलेल्या संगमनेरात दरवर्षी दिवाळीच्या काळात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, संगमनेर तालुका दूध संघ, एस.आर.थोरात दूध संघ, नवले दूध संघ यासह अनेक खासगी आस्थापनांच्या कर्मचार्यांना मिळणारा बोनस खरेदीच्या रुपाने संगमनेरच्या बाजारपेठांमध्ये फिरत असल्याने दिवाळीच्या काळात संगमनेरचे सर्वच रस्ते ग्राहकांच्या गर्दीने अक्षरशः फुललेले असतात. दिवाळीच्या पंधरा दिवसांच्या कालावधीत एकट्या संगमनेरात होणार आर्थिक उलाढाल 400 ते 500 कोटी रुपयांच्या घरात असते.
गेल्या वर्षी संपूर्ण देशात कोविडच्या भयाखालीच दिवाळी साजरी झाल्याने ग्राहकांचा मोठा निरुत्साह होता. यावर्षी मात्र कोविडचे संक्रमण कायम असतानाही नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. त्या पार्श्वभूमीवर संगमनेरातील बहुतेक व्यापार्यांनी लाखो रुपयांचा माल आपल्या दुकानात भरला आहे. मात्र तो खरेदी करण्यासाठी आवश्यक असलेला पैसा अजूनही नागरिकांच्या हाती पडलेला नसल्याने दिवाळीपूर्व आठवडे बाजार असूनही रोज्चया गरजेच्या वस्तू खरेदी करण्याशिवाय ग्राहकांनी दिवाळीची खरेदी मात्र टाळली आहे. त्यामुळे बहुतेक दुकानदारांना अद्यापही ग्राहकांची प्रतीक्षा आहे.
संगमनेर तालुका डोंगरी म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील बहुतेक वर्ग शेतकरी अथवा त्या निगडीत व्यवसायात असल्याने त्यांचा दिवाळीचा सण दूध संघाकडून मिळणारे वार्षिक रिबेट व साखर कारखान्याकडून मिळणारा फरकाचा पैसा यावरच अवलंबून असते. मात्र हा पैसा अजूनही खातेदारांना अप्राप्त असल्याने जोपर्यंत तो मिळत नाही तोपर्यंत बाजारपेठांमध्ये गर्दी होणार नाही हे संगमनेरच्या बाजरपेठेचे वैशिष्ट्य आहे. मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर साखर कारखान्यासह तालुका दूध संघ, एस.आर.थोरात व नवले उद्योग समूहाकडून खातेदारांच्या रकमा बँकेत पाठविण्यात आल्या आहेत, मात्र आजचा शनिवार आणि उद्याचा रविवार आडवा आल्याने सदरचे पैसे सोमवारी उशिराने खातेदारांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे संगमनेरच्या बाजारपेठेत खर्याअर्थी मंगळवारपासून गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.
तालुक्यातील शेतकरी व मजूरांना अद्यापही बोनसची प्रतीक्षा असली तरी काही मोठ्या खासगी आस्थापनांमधील पगारदार नोकरांना मात्र यापूर्वीच बोनस प्राप्त झाल्याने सध्या बाजारपेठेत त्यांचीच गर्दी दिसत आहे. मात्र ती फार मोठी नसल्याने व्यापारी वर्गाला अजून काहीशी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दिवाळीच्या काळात संगमनेरच्या बाजारपेठेत होणार्या एकूण आर्थिक उलाढालींपैकी शंभर कोटी रुपयांची रक्कम एकट्या अमृत उद्योग समूहाची असते. याशिवाय वरील मोठ्या आस्थापनांमधील खातेदार व कर्मचार्यांना मिळणार्या बोनसच्या रकमाही कोट्यावधीच्या घरात असतात. मात्र हा पैसा प्रत्यक्ष बाजारपेठेत येण्यासाठी अजूनही थोडी प्रतीक्षा करावी लागणार असून संगमनेरच्या बाजारपेठेत दिवाळीपूर्वी दोन दिवस तुफान गर्दी उसळण्याची दाट शक्यता त्यातून निर्माण झाली आहे.