‘एस.आर.थोरात’ समूहाकडून 8.63 कोटी बँकेत वर्ग
नायक वृत्तसेवा, संगमनेर
एस. आर. थोरात समूहाने मागील 28 वर्षांची परंपरा जपत दूध उत्पादक शेतकर्यांना दूध दर फरकाबरोबर दूध पेमेंट ऑक्टोबर अखेरपर्यंत, वाहतूक पेमेंट, दूध वितरक कमिशन, कर्मचारी पगार व बोनस आणि सभासद लाभांश असे एकूण 8 कोटी 63 लाख रुपये बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.
संचालक मंडळ बैठकीत संस्थेचे संचालक पृथ्वीराज थोरात यांनी मत व्यक्त करताना संस्थेने दूध उत्पादकांसाठी गत वर्षात राबविलेले उपक्रम दूधाळ गायी खरेदीसाठी व संगोपनासाठी आय.सी.आय.सी.आय. बँक व किसान क्रेडीट कार्ड योजनेमार्फत एक कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर ‘मिशन गगनभरारी’च्या अंतर्गत पशुवैद्यकीय सेवा, संतुलित आहार, गोठा विकास, आरोग्य विमा आणि सेंद्रीय व पूरक पोषक चारा लागवडीसारखे यशस्वी उपक्रम राबवत आहोत व पुढील काळात प्रतिजैविके व बुरशी विरहीत दूध निर्मितीसाठी संस्था आग्रही राहणार आहे. कोविडमध्ये दूध उत्पादनात सातत्य टिकून राहण्यासाठी संस्थेने एकही दिवस दूध संकलन बंद ठेवले नाही. मात्र महाराष्ट्र शासनाने फक्त सर्व सहकारी दूध संघांना 5 रुपये प्रतिलिटर अनुदान जाहीर केल्यामुळे संस्थेचे अतोनात आर्थिक नुकसान झाले. संस्थेच्या उत्पादनाची मागणी असणारे सर्व पूरक व्यवसाय बंद होते. त्यामुळे संस्थेकडे अतिरिक्त उत्पादन होऊन मोठ्या प्रमाणात दूध पावडर आणि बटरचा साठा तयार झाला. यात संस्थेचे अतिरिक्त भांडवल गुंतले असतानाही स्वर्गीय संभाजीराजे थोरात यांच्या राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक व शेतकर्यांच्या हिताने भारावलेल्या विचारांच्या प्रेरणेतून, संस्थेने नेहमी दूध उत्पादक यांच्या हिताचा निर्णय घेत आली आहे व यापुढे देखील दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. शेवटी दीपावलीच्या शुभेच्छा देत प्रदूषण विरहित दीपावली साजरी करण्याचे आवाहन उद्योग समूहाचे संचालक देवराज थोरात यांनी केले.