कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात ‘रानगवा’ परतला स्थानिक युवकासह वन्यजीव विभागाच्या कर्मचार्‍यांना मिळाले दर्शन


नायक वृत्तसेवा, अकोले
कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात गुरुवारी (ता.28) दुपारच्या सुमारास रानगव्याने स्थानिक युवकासह वन्यजीव विभागाच्या कर्मचार्‍यांना दर्शन दिले. कळसूबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यामध्ये पुन्हा रानगवा परतल्याने आनंदाचे वातावरण आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या सुरुवातीला रानगव्याच्या हालचाली अभयारण्यात पाहावयास मिळत होत्या; मात्र कोरोनापासून रानगवा गायब झाला होता. मात्र मंगळवारी संपूर्ण वाढ झालेला व अंदाजे तीन ते चार वर्षे वयाचा रानगवा (नर) घाटगर वन परिमंडळातील जंगलात दिसल्याचे वनक्षेत्रपाल अमोल आडे यांनी सांगितले. घाटघर परिसरातील रहिवासी युवक विजय गांगड याने सर्वप्रथम गव्याला बघितले आणि तातडीने त्याच्याजवळील मोबाइलमध्ये छायाचित्रे टिपली.

यावेळी वनरक्षक महेंद्र पाटील यांनाही वाटेत रानगव्याने दर्शन दिले. रानगवा असल्याची खात्री पटल्यानंतर तत्काळ सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे, अमोल आडे, रवींद्र सोनार आदिंनी स्थानिक गावकर्‍यांसह टेंट कॅम्पेनिंग करणार्‍या युवकांची बैठक बोलविली. बैठकीत रानगवा संवर्धनासह सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाच्या खबरदारीबाबत विविध सूचना रणदिवे यांनी दिल्या आहेत. रानगवा किंवा गौर हा एक शाकाहारी भूचर प्राणी आहे. भारतीय पशुंच्या मनाने रानगवा ही एक सगळ्यात उंच जंगली गाय आहे. रानगवा हे भारतात ताडोबा, निलगिरी, पश्चिम घाट, पेरियारचे जंगल, सॅलनेट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, सौराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा व ईशान्य भारतीय प्रदेशांत आढळतात. हत्ती, गेंडा, पाणघोडा व जिराफ या प्राण्यांच्या खालोखाल गवा हा सर्वात वजनदार भूचर प्राणी आहे.

अभयारण्य क्षेत्रातील भंडारदरा रेंजमधील सर्व गावांतील सरपंच, ग्रामपरिस्थितीकीय विकास समितीचे पदाधिकारी तसेच तंबू कॅम्पेनिंग करणारे युवक यांची संयुक्त बैठक घेतली आहे. रानगव्याबाबत त्यांना कल्पना देण्यात आली आहे. हा वन्यप्राणी कुठल्याही प्रकारे मनुष्यासाठी उपद्रवी नाही, त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. रानगवा अभयारण्यात येणे हे शुभवर्तमान आहे. गवा कोणालाही दिसल्यास त्याला कुठलाही त्रास देऊ नये.
– गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक

गवा भारतातील खूरवाल्या प्राण्यांपैकी गवा हा सर्वांत मोठा आणि वजनदार प्राणी आहे. त्याची शरीरयष्टी भरदार असते. पूर्ण वाढलेल्या नर गव्याची उंची सुमारे 180 सेंमी. व लांबी सुमारे 300 सेंमी. असते. नराच्या शिंगांचा विस्तार मुळापासून 78-90 सेंमी. असतो. कान आकाराने मोठे असतात. नर गव्याचे वजन 900-1000 किग्रॅपर्यंत भरते. मादी ही नरापेक्षा लहान असते. गव्याच्या खांद्यावर एक मांसल उंचवटा (लहान वशिंड) असून ते पाठीच्या मध्यापर्यंत गेलेले असते. गव्याचे नुकतेच जन्मलेले पिलू सोनेरी पिवळ्या रंगाचे असते. नंतर ते हळूहळू तांबूस रंगाचे होऊन शेवटी लालसर तांबड्या रंगाचे अथवा कॉफीच्या रंगाचे होते. पूर्ण वाढ झाल्यानंतर गव्याच्या शरीराचा रंग काळा होतो.

Visits: 328 Today: 2 Total: 1118788

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *