शरद पवार, नितीन गडकरींना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी प्रदान राहुरी कृषी विद्यापीठाचा 35 वा दीक्षांत समारंभ; राज्यपालांची उपस्थिती
नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 35 व्या दीक्षांत समारंभात ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी कुलपती तथा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान गुरुवारी (ता.28) प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी कृषी क्षेत्रातील स्नातकांनी संशोधन कार्यात भाग घ्यावा, आपल्या संशोधनातून देशाचे भले करू असा संकल्प करावा अशी अपेक्षा व्यक्त करून, येत्या पाच-सहा वर्षांत कृषी अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम मराठी मातृभाषेत करण्याचा प्रयत्न असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितले. राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 35 व्या दीक्षांत समारंभात कुलपती कोश्यारी बोलत होते. प्रति कुलपती तथा कृषीमंत्री दादा भुसे, माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार, रस्ते बांधकाम व वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, अधिष्ठाता (कृषी) डॉ. प्रमोद रसाळ, महाराणा प्रताप कृषी व अभियांत्रिकी विद्यापीठ उदयपूर (राजस्थान) कुलगुरु नरेंद्रसिंग राठोड उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे ‘अन्नं बहु कुर्वीत तद् व्रतम’ हे ब्रीदवाक्य केवळ दिखाव्यासाठी नको ही प्रतिज्ञा व्यवहारात आणली पाहिजे, तसा प्रयत्न प्राध्यापक करीत आहेत. विद्यापीठाचे कार्य प्रेरणादायी आहे. पंतप्रधान मोदींचे स्वप्न साकार होतेय. याचे समाधान आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीत शेतकर्यांनी जनतेला अन्नधान्य पुरवून जिवंत ठेवले. शेतकर्यांनी निर्यातक्षम उत्कृष्ट शेतमाल तयार करावा. शेतमालाचे जास्तीत जास्त पेटंट केल्यास, निर्यातीतून चौपट उत्पन्न मिळेल. शेतकरी सुखी होईल. आत्महत्या होणार नाहीत.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे कृषी क्षेत्रातील अगाध ज्ञान आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सतत नाविन्याच्या शोधात असतात. अशा भारताच्या चमकत्या तार्यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान करण्याचे मला भाग्य मिळाले. त्यांच्या दृष्टीने ही मोठी गोष्ट नसली. तरी, विद्यापीठाच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. दोघांना निरोगी, दीर्घायुष्य लाभो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशाची उन्नती व्हावी, अशा शुभेच्छा कुलपती तथा राज्यपाल कोश्यारी यांनी दिल्या.
प्रति कुलपती तथा कृषीमंत्री भुसे यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे शेतकर्यांच्या विमा योजनेत गांभीर्यपूर्वक बदल करावे लागतील. शरद पवार यांच्याकडे कृषी विद्यापीठाचा स्टाफ व संशोधनासाठी निधी मिळावा. राज्यपाल तथा कुलपती कोश्यारी यांच्याकडे राज्यातील सर्व विद्यापीठांत मराठीत कामकाज करण्याचे आदेश करावे. तसेच देशाच्या अमृत महोत्सवी 75 व्या वर्षानिमित्त विद्यापीठांचे दीक्षांत समारंभातील इंग्रजकालीन विद्यावस्त्र बदलून, राज्याची सांस्कृतिक वेशभूषा करावी. अशा मागण्या मांडल्या. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार डॉ. सुजय विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण, राहुरीचे माजी कुलगुरु योगेंद्र नेरकर, कुलसचिव प्रमोद लहाळे उपस्थित होते. डॉ. बापूसाहेब भाकरे व डॉ. भगवान देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.