संगमनेरच्या भारतनगरमध्ये पुन्हा गोवंशाची कत्तल! पोलिसांचा छापा; पावणे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत


नायक वृत्तसेवा, संगमनेर
वारंवार छापे, कारवाया, अटक व मुद्देमाल जप्तीचे प्रकार घडूनही संगमनेरातील बेकायदा गोवंश जनावरांच्या कत्तली थांबत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यावेळी मात्र प्रदीर्घ कालावधीनंतर कत्तलखान्यांचा कुप्रसिद्ध परिसर समजल्या जाणार्‍या भारतनगर परिसरात पोलिसांनी छापा घातला असून साडेसातशे किलो गोवंशाचे मांस हस्तगत करण्यात आले आहे. या कारवाईपूर्वीच कत्तलखान्याचा चालक सरवर हाजी हा तेथून पसार झाला असून पोलिसांनी त्याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेसह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या छाप्यातून गेल्या दोन वर्षांपूर्वी राज्यातील सर्वात मोठी कारवाई झालेल्या भारतनगरमधील कसाई पुन्हा डोके वर काढीत असल्याचेही समोर आले आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार सदरची कारवाई गुरुवारी (ता.15) रात्री पावणे दहाच्या सुमारास करण्यात आली. भारतनगर परिसरात आडोशाला गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना समजली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांच्यासह पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने भारत नगरमधील एका पत्र्याच्या शेडवर छापा घातला असता तेथे मोठ्या प्रमाणात कापलेल्या गोवंश जनावरांचे मांस दिसून आले. पोलीस आल्याची कुणकुण लागताच कत्तलखान्याचा चालक मात्र पसार झाला. यावेळी पोलिसांनी त्याच्याबाबत चौकशी केली असता पसार झालेल्या कसायाची ओळख सरवर हाजी अशी असल्याचे समोर आले. यावेळी घटनास्थळावर पोलिसांनी साडेसातशे किलो वजनाचे आणि 1 लाख 87 हजार 500 रुपये मूल्य असलेले गोवंशाचे मांस हस्तगत केले. याप्रकरणी पोलीस शिपाई कानिफनाथ जाधव यांनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी सरवर हाजी (पसार, रा.भारतनगर) याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 269, 429 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या कलम 5 (अ), 5 (क), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे.

Visits: 93 Today: 2 Total: 1100330

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *