बी.जे.खताळ यांचा स्मृतीदिन घरगुती स्वरुपात ः डॉ.खताळ
बी.जे.खताळ यांचा स्मृतीदिन घरगुती स्वरुपात ः डॉ.खताळ
नायक वृत्तसेवा, संगमनेर
16 सप्टेंबर रोजी माजी मंत्री, ज्येष्ठ काँग्रेस नेते बी. जे. खताळ यांचे निधन होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. सध्याची कोरोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता व प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करण्याच्या दृष्टीने त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार नाही, अशी माहिती खताळ परिवाराच्यावतीने डॉ.राजेंद्र खताळ यांनी दिली आहे.
स्वर्गीय खताळ यांच्यावर प्रेम करणार्या त्यांचे अनेक कार्यकर्ते, स्नेही व्यक्तींकडून याबाबत विचारणा होत आहे. या सर्वांच्या भावनांचा आमच्या परिवाराला नितांत आदर आहे. मात्र दादांनी आयुष्यभर जी मूल्ये जोपासली त्यात कठोर शिस्त, सर्व शासकीय नियमांचे पालन, सामाजिक भान या गोष्टींना अतिशय महत्व होते. सध्याच्या परिस्थितीत कोणतेही जाहीर कार्यक्रम घेऊन लोकांच्या जीविताला धोका निर्माण करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे मनापासून इच्छा असनूही यावर्षी खताळ परिवाराच्यावतीने कोणताही कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. कोरोनाचे संकट संपल्यावर स्वर्गीय दादांप्रती श्रद्धाभाव व्यक्त करण्यासाठी आपण नक्कीच एकत्र येऊ, असेही डॉ.खताळ यांनी पत्रकातून म्हंटले आहे.