डॉ.योगेश निघुतेला एक दिवसाची पोलीस कोठडी! आजही न्यायालयात हजर करावे लागणार; पुन्हा होणार कोठडीची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
डॉ.पूनम निघुते आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ.योगेश निघुते याला संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. डॉ.निघुते याने अटक टाळण्यासाठी गेल्या दोन महिन्यात मोठी शर्थ केली. अटकपूर्व जामीनासाठी त्याने जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता, तो फेटाळला गेल्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली, मात्र तेथेही दिलासा मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर गुरुवारी सकाळी त्याने संगमनेर पोलिसांसमोर शरणांगती पत्करली. आज दुपारनंतर त्याला पुन्हा न्यायालयासमोर उभे करावे लागणार आहे.
दोन महिन्यांपूर्वी 29 ऑगस्ट रोजी संगमनेरातील सर्वपरिचित असलेल्या बालरोगतज्ज्ञ डॉ.योगेश निघुते याची पत्नी डॉ.पूनम यांनी आपल्या घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास बांधून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर दोन दिवसांनी मयत डॉ.पूनम यांच्या भावाने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करीत डॉ.योगेशवर अनेक गंभीर आरोप केले होते. 2011 साली विवाह झाल्यापासूनच त्याने पैशांसाठी आपल्या बहिणीचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यामुळे आपल्या वडिलांनी वेळोवेळी डॉ.पूनमच्या बँक खात्यांमध्ये पैसे भरुन डॉ.योगेशची पैशांची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद करतांना तेव्हापासून गेल्या वर्षीपर्यंत बँकेत भरलेल्या पैशांचे विवरणही पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलिसांनी भा.द.वीच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.
मात्र त्या दरम्यान डॉ.योगेश याने अटक टाळण्यासाठी सुरुवातीला संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यावरील सुनावणीच्यावेळी सरकारी पक्षाचे वकील बी.जी.कोल्हे यांनी न्यायालयाचे कामकाज सुरु होताच 18 सप्टेंबरपर्यंत आरोपीला अटक होणार नसल्याचे सांगितल्याने डॉ.पूनम यांच्या नातेवाईकांच्या मनात संशय निर्माण होवून त्यांनी सरकारी वकीलांच्या भूमिकेवर अविश्वास व्यक्त करीत वकील बदलण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने संबंधितांची कानउघडणीही केली. यानंतर त्याच्या जामीनअर्जावर अभिप्राय नोंदविताना तपासी अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांनी घाटी रुग्णालयाकडून मयतेचा शवविच्छेदन अहवाल अप्राप्त असल्याने तो मिळेपर्यंत आरोपीला अटक करणार नसल्याचे न्यायालयाला सांगितले.
त्यामुळे संगमनेरच्या अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने डॉ.योगेशला 18 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते, मात्र शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मात्र त्याचा जामीनअर्ज फेटाळण्यात आला. त्याविरोधात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. त्यावर बुधवारी (ता.20) सुनावणी घेण्यात आली. मात्र सरकारी पक्षाच्यावतीने न्यायालयासमोर सबळ पुरावे सादर करण्यात येवून त्याच्या अटकपूर्व जामीनाला विरोध करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. मात्र सुनावणीत समोर आलेले विविध मुद्दे, सरकारी पक्षाने पुरावे सादर करीत केलेला तीव्र विरोध यावरुन आपला जामीन अर्ज फेटाळला जाणार याचा अंदाज येताच डॉ.योगेश याने आपला अर्ज माघारी घेत गुरुवारी (ता.21) संगमनेर शहर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते.
तपासी अधिकारी पंकज शिंदे यांनी गुरुवारीच त्याला न्यायालयासमोर हजर करीत पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी बचाव पक्षाचे वकील अॅड.अतुल आंधळे यांनी त्याला जोरदार विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने त्याला एक दिवसाची कोठडी सुनावली, त्याची मुदत आज संपली असून दुपारी त्याला पुन्हा न्यायालयात नेले जाणार असून आजही पोलिसांकडून त्याच्या कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांनी सांगितले. संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडवून देणार्या या घटनेने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र ढवळून निघाले होते.