डोळासणे शिवारात कारचा टायर फुटून पलटी एक महिला किरकोळ जखमी; मृत्यूंजय दूतांची अपघातस्थळी मदत

नायक वृत्तसेवा, घारगाव
अत्यंत रहदारी असणार्या आणि दयनीय अवस्था झालेल्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची श्रृंखला अद्यापही सुरूच आहे. गुरुवारी (ता.21) सकाळी डोळासणे शिवारात अल्टो कारचा टायर फुटून महामार्गाच्या कडेला पलटी झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.

याबाबत डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील रहिवासी दत्तात्रय मनोहर कुलकर्णी हे पत्नी कल्याणीसह पुण्याहून नाशिकडे अल्टो कारने (क्र.एमएच.15, डीसी.1985) जात होते. दरम्यान, सद्यस्थितीत महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. त्यातच डोळासणे शिवारातील बांबळेवाडी जवळील पेट्रोल पंपासमोर कारचा टायर फुटल्याने थेट महामार्गाच्या कडेला पलटी झाली.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून, पत्नी कल्याणी कुलकर्णी या जखमी झाल्या आहेत. अपघातस्थळी मृत्यूंजय दूत दीपक लोहकरे आणि मारुती बांबळे यांनी धाव घेत तत्काळ मदत कार्य केले. रुग्णवाहिकेद्वारे जखमी महिलेस शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ हलविले. तोपर्यंत या अपघाताची महामार्ग पोलिसांना माहिती मिळताच उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे, पोलीस कर्मचारी मंडलिक, ठोंबरे, पुजारी यांनीही घटनास्थळी येवून वाहतूक सुरळीत केली.
