श्रीरामपूर-बेलापूर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात दिवाळीनंतर चौपदरीकरणाच्या कामाचा होणार शुभारंभ

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
श्रीरामपूर ते बेलापूर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने बुधवारपासून (ता.20) सुरुवात केली आहे. दोन तीन दिवसांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर या रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. दिवाळीनंतर चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.

श्रीरामपूर ते बेलापूर रस्त्याच्या चौपदरीकरणास मंजुरी मिळाली असून या रस्त्याच्या आजूबाजूच्या नागरिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमणाच्या नोटिसा बजावल्या आहेत. तीन-तीन नोटिसा बजावल्यानंतरही अजून पाहिजे त्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यास या विभागाला अद्याप यश आलेले नाही. अजूनही लोकांची अतिक्रमणे आहेत. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर ती काढण्यात येणार आहेत. चार दिवसांपूर्वी रस्त्याचे मोजमाप झाले आहे. सध्या दसरा व दिवाळी सणामुळे हे काम सुरू झालेले नाही. परंतु दिवाळीनंतर कामाचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी त्यास दुजोरा दिला आहे.

रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले होते. खड्डे वाचविण्याच्या नादात वाहनचालकांकडून लहान मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त होत होती. तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी प्रवासी, वाहनचालक व नागरिकांनी केली होती. काल खड्डे बुजविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केले आहे. रस्त्याच्या चौपदरी कामाच्या निधीतून हे काम सुरू करण्यात आले आहे. खड्डे बुजविल्यानंतर चौपदरीकरणाचे काम सुरू होणार असले तरी प्रत्यक्ष या कामाला दिवाळीनंतरचा मुहूर्त लाभणार आहे.

Visits: 12 Today: 1 Total: 79470

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *