राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ओळख ‘रत्नपारखी’! काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांची स्तुतीसुमने; भाजपच्या अप्रत्यक्ष ‘ऑफर’ नंतरच्या वक्तव्याने नव्या चर्चा..
श्याम तिवारी, संगमनेर
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी भाषांतरीत केलेल्या ‘सिटीझनविल’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचे राजकीय क्षेत्रात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. खुद्द तांबे यांनी गुरुवारी नगरमध्ये या विषयावर भाष्य केले आहे. राज्यात फडणवीसांची ओळख ‘रत्नपारखी’ अशी असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्यावर एकप्रकारे स्तुतीसुमनंच उधळली. यावेळी मुलाखतकाराने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले असले तरीही ‘त्या’ कार्यक्रमात फडणवीसांनी दिलेली अप्रत्यक्ष ‘ऑफर’ मात्र त्यांनी मान्यही केली नाही आणि धुडकावूनही लावली नाही. त्यामुळे आगामी काळात तांबे भाजप नेते म्हणून समोर आल्यास आश्चर्य वाटू नये अशीही चर्चा आता जिल्ह्यात सुरु झाली आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याचे गव्हर्नर गॅविन न्यूसन यांनी लिहिलेल्या ‘सिटीझनविल’ या इंग्रजी पुस्तकाचे काँग्रस नेते सत्यजीत तांबे यांनी मराठीत भाषांतर केले. नुकताच मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळाही पार पडला. याच कार्यक्रमात फडणवीस यांनी माजीमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांना उद्देशून ‘तुमच्याकडे जी चांगली लोकं आहेत त्यांना संधी द्या, नाहीतर त्यांच्यावर आमची नजर आहे’ असे सूचक वक्तव्य करीत राज्यात खळबळ उडवून दिली होती. त्यांचे हे बोलणे सत्यजीत तांबेंसाठी एकप्रकारे ‘राजकीय ऑफर’ असल्याचा अर्थही अनेक राजकीय विश्लेषकांनी काढला.
त्यावरुन राज्यासह खुद्द बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघात वेगवेगळ्या चर्चा रंगत असतानाच एका राज्यस्तरीय वृत्तपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीने गुरुवारी (ता.22) तांबे यांची मुलाखत घेतली. यावेळी वेगवेगळ्या विषयांसह मुलाखतकाराने फडणवीसांच्या ‘त्या’ ऑफरचा थेट उल्लेख करीत तांबे यांना बोलते करण्याचा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना तांबे यांनी भाजपामध्येही अनेकजण चांगले आहेत, त्यांच्यावरही आमची नजर असते. रातकीय लोकांनी एकमेकांकडे काय चांगले आहे यावर नजर ठेवलीच पाहिजे अशी मिश्किल टीपणी करुन या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
मात्र मुलाखतकाराने आणखी उकरल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात राजकीय रत्नपारखी म्हणून ओळखले जात असल्याचे सांगत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळतांना ते चांगल्या लोकांवर नजरही ठेवतात आणि त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्नही करतात. त्याची ‘ती’ भावना चांगलीच असून त्यात काहीही चुकीचे नसल्याचे सांगून त्यांनी जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राच्या भुवयांही उंचावल्या. राजकीय संधीच्या विषयात परिस्थिती फार महत्वाची भूमिका पार पाडते. मात्र ती शंभर टक्के कोणाच्याही हाती नसते. अगदी पक्षाच्या अथवा पक्षनेतृत्व व स्वतःच्याही ती नियंत्रणात नसल्याचेही ते म्हणाले.
तुमच्यासारखा उत्तम नेता पक्षात असतानाही संधी का मिळाली नाही या प्रश्नावर त्यांनी सूचक विधान करताना ‘मी’ त्यावर बोलणं योग्य होणार नसल्याचे सांगताना आपल्या राजकारणाची सुरुवात 27 सप्टेंबर 2000 साली एन. एस. यू. आयच्या सचिवपदापासून झाली. मात्र दुर्दैवाने आपणास संधी देताना प्रत्येकवेळी परिवाराची चर्चा होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. 2014 साली पक्षाने आपणास विधानसभेची उमेदवारीही दिली व त्यापूर्वी दहा वर्ष आपण जिल्हा परिषदेच्या सदस्यपदावरही काम केल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. अशा वेगवेगळ्या वेळी आपणास पक्षाकडून संधी देण्याचा प्रयत्न झाला असला तरीही आपल्या अवतीभोवती जी मंडळी आहे, संघटनेच्या माध्यमातून चांद्यापासून बांद्यापर्यंत जे मित्र, सहकारी आपण जमवले आहेत त्यांच्या मनात आपण ज्या समर्पित भावनेने पक्षाला दिले, त्या तुलनेत पक्षाने मात्र हात आखडता घेतल्याची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकारण हा संख्याबळाचा खेळ असून या खेळात तुम्ही कितीही चांगले मुद्दे मांडले आणि संघटनेच्या माध्यमातून कितीही संख्या वाढवली तरीही यश मिळवण्यासाठी एक वेगळी व्यूहरचना करावी लागते असे सांगताना त्यांनी गेल्या दशकभरापासून एकामागून एक पराभव पचवणार्या स्वपक्षाबाबतही भाष्य केले. दुर्दैवाने आपला पक्ष अशा प्रकारची व्यूहरचना करण्यात व राजकीय डावपेच मांडण्यात अपयशी ठरल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. आज काँग्रेसची भूमिका खूप चांगली आहे, त्यांच्याकडे असलेले विषयही चांगले आहेत आणि सत्ताधारी गटाबाबत वातावरणही खराब आहे. मात्र असे असतानाही पक्षाकडे नेमका डावपेच नसल्याने यश मिळवण्यात पक्ष कमी पडत असल्याची स्पष्टोक्ती त्यांनी केली.
सिटीझनविल या भाषांतरीत पुस्तकावरही दिलखुलास मतप्रदर्शन करताना त्यांनी शहर विकासाचा मुद्दा पक्षीय पातळीच्या पलिकडे नेवून सर्व राजकीय पक्षांनी अजेंड्यावर घेतला पाहिजे असे स्पष्ट मत व्यक्त केले. न्यूसम यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचे भाषांतरही आपण याच भावनेतून केल्याचे सांगत त्यांनी तंत्रज्ञान आणि लोकसहभागातून हा विषय आपण सहजपणे करु शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पुस्तकातील विषय अमेरिकेतील आहेत, भारतात त्याचे अनुकरण कसे शक्य आहे ही मानसिकता बदलण्याची गरजही त्यांनी या मुलाखतीतून व्यक्त केली. या पुस्तकातून प्रेरणा घेवून आपणही आपल्या कल्पना तयार करु शकतो व त्या प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्नही करु शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मागील 25 वर्ष आपली दृष्टी ग्रामविकासाची असल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा दाखला देत त्यांनी उशिराने का होईना आता आपण शहर विकासाचे धोरण स्वीकारले आहे. पण तोपर्यंत काही गोष्टींना उशीर झाल्याने यापुढे या विषयावर आपल्याला अधिक गतीने काम करावे लागणार असल्याचे सांगितले. अवघ्या अकरा मिनिटांच्या त्यांच्या या मुलाखतीत त्यांची राजकीय दृष्टी आणि भविष्यातील त्यांचा राजकीय प्रवास या विषयाच्या विविध कड्या उलगडल्या गेल्या. त्यातून समोर आलेल्या काही मुद्द्यांनी मात्र त्यांना राज्यासह जिल्ह्यातील राजकारणाच्या चर्चेत आणून बसविले असून त्यातून वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.