नेवासा तालुक्यात उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई देशी दारूच्या बाटल्यांत पाण्याची भेसळ करण्याचा प्रकार उघडकीस

नायक वृत्तसेवा, नेवासा
महागड्या विदेशी ब्रँडच्या नावाने बनावट दारू किंवा भेसळ करण्याचे प्रकार अधूनमधून उघडकीस येतात. नेवासा तालुक्यात मात्र देशी दारूच्या बाबततीही असा प्रकार घडत असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यातून पुढे आले आहे. रात्री अकरा ते पहाटे चार यावेळेत दुकानात देशी दारूच्या बाटल्यांत पाण्याची भेसळ करून त्या पुन्हा सीलबंद केल्या जात असल्याचे आढळून आले. एकाच रात्री पथकाने चार दुकांनावर छापे टाकून हजारो बाटल्या जप्त करून आरोपींना अटकही केली आहे.

अहमदनगरच्या उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एकाच वेळी नेवासा, नेवासाफाटा, सलाबतपूर व घोडेगाव येथील परवानाधारक देशी दारू दुकानांवर छापा टाकून ही कारवाई केली. भेसळ होत असल्याची माहिती मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली. दुकानाची वेळ संपल्यावर रात्री 11 ते पहाटे चार यावेळेत दुकानातील सीलबंद बाटल्या उघडायच्या. त्यातील थोडी दारू काढून घेऊन त्या जागी पाणी भरायचे आणि बाटली पुन्हा सिलबंद करायची. असा उद्योग चालत होता.

नेवासा फाटा येथील परवानाधारक रवींद्र कत्तेवार यांच्या दारू दुकानात पथकाने छापा टाकला तेव्हा आरोपी प्रशांत सोडा, लिंगया प्रशांत गौड व नरसिमल्लू पुठ्ठा (सर्व मूळ रा.आंध्र प्रदेश) हे देशी दारूच्या सीलबद बाटल्यांमधून काही प्रमाणात दारू काढून ती दुसर्‍या बाटल्यांमध्ये भरत होते. दारू काढलेल्या बाटल्यामध्ये पाणी भरून पुन्हा चिकट टेप लावून पहिल्यासारखेच सील करत होते. या दुकानातून पथकाने 300 पत्री बनावट बुच, संत्रा, बॉबी या ब्रँडचे बनावट दारू तसेच चिकट टेप, भेसळयुक्त देशी दारूच्या 3 हजार 555 सीलबंद बाटल्या, काचेच्या 36 बाटल्या, पाण्याचे जार असा मुद्देमाल जप्त केला आहे.

याचवेळी दुसर्‍या पथकाने सलाबतपूर येथील देशी दारूच्या दुकानात छापा टाकला. तेथेही असाच प्रकार सुरू होता. दुकानाशेजारीच असलेल्या एका खोलीत प्रशांत राधेशाम गौड हा बाटल्यांमध्ये पाणी भरून भेसळयुक्त दारू तयार करत होता. याठिकाणी पथकाने 300 बुच व 300 रिकाम्या बाटल्या, 1 लोखंडी बादली तसेच 9 बाटल्यांमध्ये भेसळयुक्त मद्य आढळून आले. त्यानंतर घोडगाव येथील बी. एम. कलाल या देशी दारू दुकानामध्येही पथकाला असाच प्रकार आढळून आला. याठिकाणी 4128 रिकाम्या बाटल्या, 86 बॉक्स, 775 बनावट बुचे, प्लास्टिक बकेट आदी मुद्देमाल आढळून आला.

Visits: 3 Today: 1 Total: 27333

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *