सर्पदंश झालेल्या आदिवासी युवतीचा उपचारांअभावी मृत्यू आदिवासी प्रबोधन सेवा संघप्रणित तंट्या ब्रिगेडचे नेवासा तहसीलदारांना निवेदन

नायक वृत्तसेवा, नेवासा
सर्पदंश झालेल्या सोळावर्षीय आदिवासी मुलीला नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (ता.20) आदिवासी प्रबोधन सेवा संघप्रणित तंट्या ब्रिगेडच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनात म्हटले की, अश्विनी लहू बर्डे (वय 16, रा. नागझिरी, नेवासा) या आदिवासी समाजाच्या युवतीला सर्पदंश झाल्यामुळे शनिवारी (ता.18) रात्री नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र या रुग्णालयातील आरोग्य सेवकांनी उपचार करण्यास विलंब व टाळाटाळ केल्यामुळे अश्विनीवर उपचार करण्यासाठी येथील रुग्णालयातून 108 रुग्णवाहिकाही जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी मिळालेली नव्हती. खासगी रुग्णवाहिकेतून सर्पदंश झालेल्या युवतीला जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी विलंब झाल्यामुळे तिला जीव गमवावा लागला. या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

सदर निवेदन देताना आदिवासी प्रबोधन सेवा संघ प्रणित तंट्या ब्रिगेडचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भंगाड, चर्मकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुरेश शेंडे, क्रांतिकारी यशवंत नाईक संघटनेचे रणजीत माळी, सोमनाथ माळी, गणेश पवार, जयराम पवार, सुभाष बर्डे, सुरेश गांगुर्डे आदी उपस्थित होते.

सर्पदंश झालेल्या मुलीला जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी नेवासा फाटा येथील रुग्णालयासमोर 108 रुग्णवाहिका उभी होती. मी 108 ला संपर्क केला असता पाच मिनिटांत गाडीकडून आपणास कळविण्यात येईल असे सांगितले. मात्र एक तास वाट पाहूनही 108 रुग्णवाहिका मिळाली नाही. पदरमोड करून खासगी रुग्णवाहिकेने रुग्णाला वेळेत नेता न आल्यामुळेच या युवतीचा मृत्यू झाला आहे.
– सुरेश शेंडे

Visits: 167 Today: 1 Total: 1956132

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *