अकोले, राहाता व कोपरगाव तालुका एकेरी रुग्णसंख्येत! संगमनेर तालुक्याच्या सरासरीसह रुग्णसंख्येतही झाली मोठी घट..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या आठवड्यात संगमनेरसह जिल्ह्यातील काही तालुक्यांची सरासरी रुग्णगती उंचावल्याने निर्माण झालेली चिंता मागील दोन दिवसांच्या खालावलेल्या रुग्णसंख्येने कमी केली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच संगमनेरसह पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व नेवासा तालुक्यातील रुग्णगती वाढली होती. मात्र काल आणि आज जिल्ह्याची रुग्णसंख्या पुन्हा उतारावर आल्याने दिलासा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे एप्रिलमध्ये जिल्ह्यात उच्चांकी रुग्णसंख्येचा तालुका ठरलेल्या राहातासह आज अकोले व कोपरगाव तालुक्यातून एकेरी रुग्ण समोर आले आहेत. तर संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येतही निम्म्याने घट होवून ती आज पंधरावर आली असून त्यात शहरातील अवघ्या एका रुग्णाचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 23 हजार 93 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.


जिल्ह्यात कोविड संक्रमणाची दुसरी लाट आणण्यास जानेवारी व फेब्रुवारीत झालेले विवाह सोहळे, राजकीय सभा, निवडणूका व सार्वजनिक कार्यक्रम कारणीभूत ठरले होते. तसाच प्रकार पुन्हा सुरु झाल्याने व त्याकडे स्थानिक यंत्रणांचे दुर्लक्ष होवू लागल्याने कमी झालेली जिल्ह्याची रुग्णगती जुलैच्या पहिल्याच दिवसापासून वाढण्यास सुरुवात झाली. मात्र त्या दरम्यान प्रशासनाने पुन्हा एकदा मरगळ झटकून नियमबाह्य पद्धतीने गर्दी जमा करुन होणार्‍या कार्यक्रमांवर कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात केल्याने अशा पद्धतीच्या सोहळ्यांवर बर्‍याच प्रमाणात मर्यादा आल्या आहेत. मात्र ग्रामीणभागातील काही ठिकाणी अजूनही कोविड नियम धुडकावून मोठ्या उपस्थितीत लग्नसोहळे व दहाव्याचे विधी होत असल्याने जिल्ह्यासह तालुक्यातील कोविड संक्रमण अजूनही पूर्णतः थांबलेले नाही.


जिल्ह्यातील सर्वाधीक रुग्णगती असलेल्या तालुक्यांमध्ये पहिल्या तिनात सामील असलेल्या संगमनेर तालुक्यातून चालू महिन्याच्या पहिल्याच दिवसात 122 रुग्णसमोर आले होते. त्यामुळे तालुक्याची सरासरी उंचावून थेट 41 वर पोहोचली होती. मात्र कालच्या रविवारी त्यात घट होवून 24 तर आजच्या सोमवारी अवघे 15 रुग्ण समोर आल्याने सुरुवातीला उंचावलेली रुग्णगती पुन्हा नियंत्रणात आली आहे. आज शासकीय प्रयोगशाळेचे दोन, खासगी प्रयोगशाळेचे नऊ आणि रॅपीड अँटीजेनच्या चार निष्कर्षातून तालुक्यातील 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या शहरातील एकमेव 38 वर्षीय महिलेचा समावेश आहे.


याशिवाय तालुक्यातील अकरा गावे आणि वाडीवस्त्या मिळून आज चौदा जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे समोर आले असून त्यात सावरगाव घुले येथील 28 वर्षीय तरुण, नान्नज दुमाला येथील 38 वर्षीय तरुण, धांदरफळ येथील 65 वर्षीय महिला, अंभोरे येथील 25 वर्षीय तरुण, बिरेवाडी येथील 38 वर्षीय महिला, साकूर येथील 36 व 17 वर्षीय तरुण, कनोलीतील 30 वर्षीय तरुण, रहिमपूर येथील 42 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 79 व 27 वर्षीय महिला, बोटा येथील 70 वर्षीय महिलेसह 29 वर्षीय तरुण व आश्‍वी बु. येथील 38 वर्षीय महिलेचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 23 हजार 93 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.


आज जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे एकूण रुग्णसंख्या पुन्हा एकदा चारशेहून खाली येत आज जिल्ह्यातील अकोले, राहाता व कोपरगाव या तीन तालुक्यातून एकेरी रुग्ण समोर आले आहेत. आजच्या जिल्ह्यातील सर्वाधीक 57 रुग्ण पारनेर तालुक्यातूनच समोर आले असून त्या खालोखाल पाथर्डी 42, नेवासा 37, श्रीगोंदा 34, कर्जत 30, जामखेड 24, अहमदनगर महापालिका क्षेत्र व राहुरी प्रत्येकी 20, श्रीरामपूर 16, संगमनेर 15, शेवगाव 13, नगर ग्रामीण 11 कोपरगाव व राहाता प्रत्येकी सात, अकोले सहा व इतर जिल्ह्यातील चार अशा एकूण 343 रुग्णांचा त्यात समावेश आहे. आज वाढलेल्या रुग्णांमुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 82 हजार 544 झाली आहे.

Visits: 9 Today: 1 Total: 115122

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *