राज्य महिला आयोगाचे रिक्त पद तत्काळ भरा! जिजाऊ ब्रिगेडची प्रांताधिकार्यांकडे निवेदनातून मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात दिवसेंदिवस महिलांवर अत्याचार वाढत आहे. यातून समाजात उद्रेक होत असून, अनेकदा न्यायाची प्रतीक्षा करावी लागते. तत्काळ व समाधानकारक न्यात मिळत नाही. या पार्श्वभूमीवर महिलांना जलद न्याय मिळण्यासाठी राज्य महिला आयोगाचे रिक्त अध्यक्षपद लवकरात लवकर भरा, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडने प्रांताधिकार्यांकडे निवेदनातून केली आहे.

याबाबत संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांना गुरुवारी (ता.14) दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्य जिजाऊ ब्रिगेड संघटनेने म्हटले आहे की, राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर अन्याय-अत्याचार होत आहे. परंतु, न्याय मिळविण्यासाठी मोठी कसरत होते. त्यातही अनेकदा समाधानकारक न्याय मिळत नाही. यासाठी पीडितेसह कुटुंबियांनी कोणाकडे दादा मागायची असा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर सध्या राज्य महिला आयोगाचे रिक्त असलेले अध्यक्षपद लवकरात लवकर भरा, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या संगमनेर शाखेने केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्षा डॉ. दीपाली पानसरे, तालुकाध्यक्षा माधुरी शेवाळे, नयना रहाणे आदी उपस्थित होत्या.
