कर्करोग रुग्णांच्या सेवेसाठी टाटा-एसएमबीटी हॉस्पिटल एकत्र ः थोरात टाटा मेमोरियल सोबत एसएमबीटीचा सहयोग करार; रुग्णांना होणार फायदा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाशिकच्या एसएमबीटी हॉस्पिटलने मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहाय्याने नाशिक येथील कॅम्पसमध्ये सर्व सुविधायुक्त स्वतंत्र कर्करोग सुविधा सुरु केल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना उपचारांसाठी मुंबई-पुणे यांसारख्या मोठ्या शहरांत जाण्याची गरज पडणार नाही. त्यांना इथेच अत्यंत माफक दरात उपचार मिळतील, असा आशावाद राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

धामणगावमधील नंदी हिल्स येथे एसएमबीटी हॉस्पिटलच्या प्रांगणात टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांच्या सहकार्यातून एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्युटचा शुभारंभ झाला. यावेळी टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, उपसंचालक डॉ. पंकज चतुर्वेदी, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे, डॉ. जयश्री थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना टाटा मेमोरियलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे म्हणाले, एसएमबीटीला मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाने संलग्न काम करण्याचा मोठा अनुभव आपल्या सोबत असून एसएमबीटी हॉस्पिटल ही टाटा मेमोरियल सेंटरची महाराष्ट्रातील केवळ सर्वांत मोठी शाखाच नाही, तर स्वतः एसएमबीटी कॅन्सर हॉस्पिटल नावारूपाला येईल अशी आम्हांला आशा आहे. एसएमबीटीसोबतचा हा करार दोन अधिक दोन, चार नव्हे तर दोन अधिक दोन बरोबर आठ असा होवो असे ध्येय असल्याचे नमूद केले.

तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, कोरोना महामारीने पुरेशा व दर्जेदार आरोग्य सुविधांचे महत्त्व अधोरेखीत केले आहे. फक्त मोठ्या शहरातल्या पंचतारांकित रुग्णालयांमध्येच चांगल्या आरोग्य सुविधा व उपचार मिळतात हा समज खोडून काढत एसएमबीटी रुग्णालय ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना अत्यंत माफक दरात आरोग्य सेवा पुरवत आहे. कोरोना महामारीच्या इथल्या डॉक्टर, नर्स आणि सहकार्‍यांनी अत्यंत सेवाभावी वृत्तीने केलेले काम उल्लेखनीय आहे. बदलत्या काळासोबत कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या पाहता एसएमबीटीने देशातील अग्रगण्य टाटा मेमोरियल इन्स्टिट्युटच्या सहकार्याने स्वतंत्र कॅन्सर सेवा सुरु केल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना आता उपचारासाठी मुंबई, पुण्यासारख्या महानगरांत जाण्याची गरज राहिली नसून त्यांना इथेच दर्जेदार सुविधा मिळणार असल्याचे नमूद केले.
एसएमबीटी हॉस्पिटलच्या डीन डॉ. मीनल मोहगावकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि डेप्युटी मेडीकल सुप्रिटेंडन्ट डॉ. संतोष पवार यांनी आभार मानले. याप्रसंगी एसएमबीटी हॉस्पिटल, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.

Visits: 9 Today: 1 Total: 115599

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *