जिल्ह्यातील तेरा गावांत 23 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाउन अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहारांसह रस्ते बंद

नायक वृत्तसेवा, नगर
राज्यात एकापाठोपाठ एक सवलती जाहीर करून व्यवहार सुरळीत होत असताना अहमदनगर जिल्ह्यात मात्र लॉकडाउन पाठ सोडायला तयार नाही. दहा दिवसांपूर्वी जिल्ह्यातील 69 गावांत लॉकडाउन करण्यात आला होता. त्यातील 61 गावांची परिस्थिती सुधारल्याने तेथील लॉकडाउन उठवण्यात आला. मात्र, आठ गावांत अद्यापही रुग्ण असल्याने तेथे मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. तर रुग्णसंख्या वाढलेली आढळून आलेल्या 13 गावांत 23 ऑक्टोबरपर्यंत नव्याने लॉकडाउन लावण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण 21 गावांत निर्बंध कायम राहणार आहेत.

आधीच्या आदेशाची मुदत संपल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सुधारित आदेश दिला आहे. त्यानुसार नव्या 13 गावांत 23 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाउन तर आधीच्यापैकी 8 गावांत कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वीच्या आदेशातील 61 गावे मात्र लॉकडाउनमधून मुक्त झाली आहेत. जिल्ह्यातील संसर्गाचे प्रमाण अद्यापही समाधानकाररित्या कमी झाले नाही. दहा दिवसांपूर्वी सातशे ते आठशे दैनंदिन रुग्ण आढळत होते. आता ते प्रमाण 300 ते 500 झाले आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट आता तीन ते पाच टक्के आहे. त्यामुळे वीस पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या गावांत उपाययोजना कडक करण्यात येत आहेत. अशा गावात कंटेन्मेंट झोन जाहीर करणे, बॅरिकेटींग करणे, पोलीस बंदोबस्त वाढविणे, जनता कर्फ्यूच्या माध्यमातून गाव बंद करणे, लसीकरण करणे, चाचण्या वाढविणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने 13 गावांत आता कडक निर्बंध लागू केले आहेत. तेथे अत्यावश्यक सेवा, दवाखाने, मेडिकल, कोरोना चाचणी केंद्र वगळता अन्य सर्व व्यववहार 14 ऑक्टोबरपासून 23 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिला आहे. याशिवाय या गावांत जमावबंदीचाही आदेश देण्यात आला आहे. या गावांच्या हद्दीतून कृषी माल आणि आवश्यक वस्तूंची वाहतूक वगळता नागरिकांच्या येण्या-जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत.

निर्बंध घालण्यात आलेली गावे..
संगमनेर तालुका : वेल्हाळे, उंबरी, चंदनापुरी, वडगाव पान, राजापूर, नांदुरी दुमला, मालदाड, सुकेवाडी, ओझर बु., जोर्वे
अकोले तालुका : वीरगाव, सुगाव बु., कळस बु.
श्रीगोंदा तालुका : लोणी व्यंकनाथ, घारगाव, कोथूळ
पारनेर तालुका : जामगाव, वासुंदे
कोपरगाव तालुका : टाकळी
नेवासा तालुका : चांदा

Visits: 81 Today: 1 Total: 1109380

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *