घरकूल योजनेच्या नावाने आदिवासींची फसवणूक! तालुक्यातील पठारभागात पंचायत समितीचा कर्मचारी भासवून सुरु आहे लुट

नायक वृत्तसेवा, घारगाव
पठारभागातील दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये ‘तुम्हाला घरकूल मंजूर झाले असून त्यासाठी अमुकतमूक’ रक्कम द्यावी लागेल असे सांगत चक्क गरीब आदिवासी बांधवांना लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपळगाव देपा शिवारातील मुक्ताईनगर मध्ये असे काही प्रकार समोर आल्यानंतर पंचायत समितीचेे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी त्याची दखल घेत सर्व ग्रामसेवकांना सतर्क राहण्याचे व नागरिकांनाही सावध करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी फसवणूक झालेल्या रवी मारुती मधे यांनी घारगाव पोलीस ठाण्यास तक्रारअर्ज दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता.2) दुपारी सुनील पाटील नावाची एक व्यक्ति पठारभागातील पिंपळगाव देपा परिसरात आली. या भागातील मुक्ताईनगर वसाहतीतल्या काही आदिवासी घरांमध्ये जावून त्याने ‘तुम्हाला मारुती चिमाजी मधे या नावाने घरकूल मंजूर झाले आहे, त्यासाठी पंधराशे रुपये भरावे लागतील’ तसेच ‘स्वतंत्र रेशनकार्डही करुन देतो, त्याचे अठराशे रुपये लागतील’ असे सांगत साडेतीन हजारांच्या रकमा जमा केल्या. तेथील काहींनी आम्हाला कसे कळेल पुढचं असा सवाल केला असता त्याने आपलास मोबाईल क्रमांक दिला. त्यामुळे काहींनी त्याच्यावर सहज विश्वास ठेवला व पोटतिडकीने अडचणीला साठवून ठेवलेला पैसा त्या भामट्याच्या हाती सोपवला.

दोघा-चौघांना चूना जावून तो तेथून पसार झाला. त्यानंतर ज्यांनी पैसे दिले त्यांनी घरकूल मिळाल्याच्या आनंदात वस्तीवरील इतरांना ते सांगीतले, त्यामुळे आम्हालाही मिळेल का? अशा भाबड्या विचाराने त्यांनी त्याचा मोबाईल नंबर घेवून त्यावर फोन केला असता तो बंद असल्याचे आढळले. त्यामुळे काहींचा संशय बळावल्याने त्यांनी पंचायत समितीचे सदस्य किरण मिंडे यांना फोन करुन विचारणा केली असता सदरचा प्रकार उघड झाला. याबाबत मिंडे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांना माहिती दिली.

त्यानंतर वेगाने सूत्रे फिरुन गावागावातील ग्रामसेवकांना सावधानतेचे संदेश पाठवण्यात आले. सोबत संबंधित सुनील पाटील नावाच्या भामट्याने दिलेला मोबाईल नंबरही देण्यात आला. पंचायत समितीकडून घरकूल योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जात नाहीत असे संदेश पोहोचवण्याचे आदेश सुटले. त्याप्रमाणे पठार भागात जागृतीचे काम सुरु झाले असून आम्हीही नागरिकांना आवाहन करतो की, सावध रहा. अमिषांना बळी पडू नका, पूर्ण खात्री केल्याशिवाय आपल्या कष्टाचा पैसा कोणाच्याही हाती सोपवू नका.

घरकूल योजनेसाठी कोणत्याही प्रकारे पैसे लागत नाहीत. पंचायत समितीकडून अशा पद्धतीने कोणत्याही कर्मचार्याला पाठविण्यात आलेले नाही. नागरिकांनी खात्री केल्याशिवाय अशा कोणाही अनोळखी ख्यक्तिंकडे पैसे देवू नयेत. या प्रकाराची माहिती मिळताच ठिकठिकाणच्या ग्रामसेवकांना सूचना देण्यात आल्या असून नागरिकांना सावध करण्यास सांगीतले आहे. अशा प्रकारची व्यक्ति आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना अथवा पंचायत समितीला कळवावे.
सुरेश शिंदे
तालुका गटविकास अधिकारी

