सभापती झाल्यामुळेच गटात विकास कामे करता आली ः फटांगरे आंबीदुमाला येथे जलपूजन, स्मशानभूमी सुशोभिकरणासह सभामंडपाचे भूमिपूजन

नायक वृत्तसेवा, घारगाव
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे सभापती होण्याची संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातूनच बोटा गटातील प्रत्येक गावात व वाड्या-वस्त्यांवर विविध विकास कामे करता आली, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा बोटा गटाचे जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांनी केले.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीदुमाला येथील कच नदीवर बांधण्यात आलेल्या बंधार्यातील जल पूजन व स्मशानभूमी सुशोभीकरण, सभामंडप भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, सरपंच जालिंदर गागरे, अकलापूरचे सरपंच अरुण वाघ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शांताराम वाकळे, पठारभाग युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब कुर्हाडे, जयहिंद युवा मंचचे अध्यक्ष सुहास वाळुंज, माजी सरपंच विकास शेळके, बोटा गावचे उपसरपंच पांडू शेळके, यशवंत शेळके, विलास शेळके, माजी उपसरपंच संदीप आहेर, ज्ञानेश्वर सुपेकर, भाग्यश्री नरवडे, चंद्रकांत आरोटे, दत्तोबा शिंदे, काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय ढोकरे, निखील कुरकुटे, संदीप शेळके, बाळासाहेब मुसळे, संपत भालके आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना फटांगरे म्हणाले, सभापती झाल्यामुळे बोटा गटातील गावांमध्ये व वाड्या-वस्त्यांवर विकास कामे करता आली ही सर्व कामे करत असताना कोरोनाच्या काळातही अनेकांना मदतही केली. तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून रेशनकार्ड, जातीचे दाखीले लोकांना घरपोच मिळून देण्याचे काम केले. आंबीदुमाला गावातील कच नदीवर पंधरा लाख रूपयांचा बंधारा बांधण्यात आला आणि पुन्हा स्मशानभूमी सुशोभीकरण सभा मंडपासाठी पाच लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. जेवढा निधी तुम्हांला देता येईल तेवढा निधी देण्याचे काम करणार असल्याचा विश्वास शेवटी त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सयाजी ढेरंगे, लहू नरवडे, रामदास नरवडे, भरत ढेरंगे, संदीप ढेरंगे, निखील कुरकुटे, विक्रम कजबे, सुरेश हांडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शेखर शिंदे यांनी करुन आभार मानले.
