संगमनेरातील अंमली पदार्थांच्या तस्करावर मोठी कारवाई! साडेचार किलो गांजासह ‘गर्दा’ हस्तगत; संयुक्त कारवाईत चार लाखांची रोकडही जप्त..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी कारवायांचे केंद्र बनू पहाणाऱ्या संगमनेरातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेसह शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने आज सायंकाळी सहाच्या सुमारास संगमनेर शहरात केलेल्या कारवाईत साडेचार किलो वजनाच्या गांजासह अलीकडच्या काळात पहिल्यांदाच शहरातून 72 हजार रुपये किंमतीचा गर्दा (हेरॉईन) हस्तगत केला आहे. या छाप्यात चार लाख रुपयांची रोकडही आढळून आली असून अंबादास शांताराम शिंदे याला ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार सदरची कारवाई आज (ता.1) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शहराच्या हृदयस्थानी असलेल्या शिवाजीनगर परिसरात करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शहर पोलिसांसह संयुक्तपणे शिवाजीनगरमध्ये छापा घातला. यावेळी पोलिसांना अंबादास शांताराम शिंदे (वय 43, रा. शिवाजीनगर) याच्या घरात पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये दडवून ठेवलेला 44 हजार 980 रुपये किंमतीचा चार किलो 498 ग्रॅम वजनाचा गांजा व 72 हजार रुपये किंमत असलेला 36 ग्रॅम गर्दा (हिरोईन) आढळून आला. याशिवाय संबंधित अंमली पदार्थाच्या तस्कराकडे 4 लाख 150 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 5 लाख 17 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत कला आहे.

शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपनिरीक्षक रमेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विशाल करपे, हरिश्चंद्र बांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन आडबल यांच्यासह पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी अंबादास शांताराम शिंदे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या वृत्ताने संगमनेर शहरातील अंमली पदार्थांची बाजारपेठ उघड झाली असून तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

Visits: 184 Today: 1 Total: 1109372
