संगमनेरच्या नेतृत्त्वाला ‘मुख्यमंत्री’पदाची संधी! समर्थकांना वाटतोय विश्वास; काँग्रेसला राज्यात ‘अच्छे दिन’ येण्याची आशा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य मंत्रीमंडळाकडून एकामागून एक लोकप्रिय घोषणा आणि निर्णयांचा पाऊस पडू लागल्याने राज्यात विधानसभा निवडणुकांचे वातावरण तयार होवू लागले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेला जनाधार पाहता आत्मविश्वास दुणावलेल्या विरोधकांना विधानसभेतही त्याची पुनरावृत्ती होण्याची आशा आहे. त्यामुळे जागावाटपाच्या वाटाघाटीत छोटाभाऊ आणि मोठाभाऊ यावरुन खडाजंगीही सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश पाहता काँग्रेसला राज्यात अच्छे दिन येण्याची आशा असून त्यांच्याकडून अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी आघाडीत दबावतंत्रही सुरु झाले आहे. काँग्रेस विधीमंडळाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात आघाडीच्या बैठकांमध्ये केंद्रस्थानी असल्याने त्यांच्या समर्थकांमध्येही उत्साह संचारला असून पुढचा मुख्यमंत्री संगमनेरचाच असेल असाही त्यांना विश्वास वाटत आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीला धोबीपछाड देत राज्यातील 48 जागांमधील तब्बल 30 जागा पटकावल्या होत्या. त्यावेळी राज्यात मोदी लाट कायम असल्याचे चित्र उभे करुनही भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना 42.4 टक्के मतांसह अवघ्या 17 जागांवरच समाधान मानावे लागले होते. तर, महाविकास आघाडीला वाढीव जागांसह 44.2 टक्के मते मिळाल्याने त्यांच्या उत्साहात शतपटीने वाढ झाली. या निकालांचे परिणाम गेल्या चार महिन्यांत स्पष्टपणे समोर आले. त्यातूनच गेली दहा वर्ष जेमतेम जागांवर विजय मिळवणार्या आघाडीतील नेत्यांनी सरकारच्या विविध धोरणांसह त्यांच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न उपस्थित करुन सत्ता विरोधी वातावरण तयार करण्याची प्रत्येक संधी अंमलात आणल्याने अनेक विषयांवर सत्ताधारी गट पिछाडीवर गेल्याचेही दिसून आले.
त्या दरम्यान राज्य विधानसभेची मुदतही दृष्टीपथात असल्याने लोकसभेत मिळालेले यश विधानसभेतही कायम राहील असा विश्वास बाळगून महाविकास आघाडीतील पक्ष आपापल्या पद्धतीने दावे-प्रतिदावेही करु लागले. त्यावर मात करण्यासाठी लोकसभेच्या राज्यात सर्वाधीक जागा मिळवून मनोबल दुणावलेल्या काँग्रेसने अंतर्गत सर्व्हेक्षण करुन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचा आणि काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष ठरणार असणार निष्कर्ष काढून दबाव वाढवला. त्याचा परिणाम सध्या तिनही पक्षात सुरु असलेल्या जागावाटपाच्या वाटाघाटीतही दिसून येत असून लोकसभेचे यश पुढे करुन काँग्रेसकडून किमान 125 जागा पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून आघाडीत दबावतंत्र निर्माण केले जात आहे. यासर्व घटनाक्रमात मुख्य भूमिकेसह थोरात यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी निवड झाल्याने पक्षातील त्यांचा दबदबाही वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर समोर आलेले अंतर्गत सर्व्हेचे अहवाल आणि राज्यात संभाव्य सत्ताबदल होण्याची आशा लक्षात घेता थोरात यांच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला असून राज्याच्या पुढील मुख्यमंत्रीपदावर संगमनेरच्या लोकप्रतिनिधींना संधी असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांमधून होवू लागला आहे.
लोकसभा निवडणुकांचा विचार करता राज्यात प्रमुख लढत झालेल्या महायुती आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या एकूण मतांमध्ये अवघ्या 2.2 टक्के मतांचे अंतर आहे. या निवडणुकीत महायुतीपेक्षा कणभर अधिक मते मिळवणार्या आघाडीत काँग्रेसने 17 टक्के मतांसह 13 जागा पटकावल्या आहेत. तर, दुसर्या क्रमांकावर 16.9 टक्के मतांसह शिवसेना उबाठा गटाने 9 आणि 10.3 टक्के मतांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आठ जागांवर यश मिळवले आहे. एकाअर्थी काँग्रेस आणि उबाठा गटाला मिळालेल्या एकूण मतांमध्ये फार अंतर नाही. त्यामुळे राज्यात सत्ताबदल झाल्यास मुख्यमंत्री कोण असेल अशी विचारणा यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली होती. त्यावर सर्व्हेक्षणाचा अहवाल समोर करुन पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल असे सांगत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावा ठोकल्याने आघाडीत काहीशी नाराजीही निर्माण झाली होती.
शरद पवार यांनीही निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यात फारसा रस दाखवला नाही. ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री या सूत्रावरच त्यांचीही धारणा असल्याचे दिसून आल्याने सध्या राज्यात सत्ताबदल झालाय असेच चित्र समोर ठेवून काँग्रेस आणि उबाठाकडून अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी एकमेकांवर दबावतंत्र निर्माण करण्यास सुरुवात झाली आहे. त्यातून लोकसभेतील यशाचा धागा पकडून आगामी निवडणुकीत काँग्रेसला अच्छे दिन येणार असल्याचा आणि संगमनेरच्या लोकप्रतिनिधींना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार असल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जावू लागला आहे.
लोकसभा निवडणुकीत दक्षिणेतून झालेल्या पराभवाचा ‘वचपा’ काढण्याची संधी पक्षाने द्यावी अशी मागणी करणार्या माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी थोरातांच्या विरोधात विधानसभा लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्यांच्या या वक्तव्यामागे शिर्डी विधानसभेची सुरक्षितता आहे, त्यांची खरोखरी निवडणूक लढवण्याची इच्छा आहे की, बाळासाहेब थोरात यांना त्यांच्याच मतदार संघात अडकवून ठेवण्याची खेळी आहे याचा उलगडा होण्यासाठी अजून काहीकाळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.