मालवाहतूक कंटेनर व मालट्रकचा भीषण अपघात सुदैवाने प्राणहानी नाही; मात्र लाखो रुपयांचे झाले नुकसान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
चारचाकी वाहने घेवून निघालेला कंटेनर आणि मालट्रकची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात होण्याची घटना आज सकाळी संगमनेर खुर्द शिवारात घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून कंटेनरमधील नव्या कोर्‍या चारचाकी वाहनांचीही मोठी हानी झाली आहे. या घटनेत दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक काहीकाळ खोळंबली होती, मात्र अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला घेत रस्ता मोकळा केला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुण्याहून फॉक्सव्हॅगन कंपनीची पोलो ही चारचाकी वाहने घेवून धुळ्याला निघालेला कंटेनर (क्र.एन.एल.01/ए.ई.1498) व मशिनरीसाठी वापरल्या जाणार्‍या बेअरिंग घेवून पुण्याच्या दिशेने निघालेल्या मालट्रकची (क्र.आर.जे.40/जी.ए.0646) समोरासमोर भिषण धडक झाली. हा अपघात इतका भयानक होता की धडक झाल्यानंतर कंटेनरचा पुढीलभाग 90 अंशाच्या कानात फिरला तर मालट्रकचा पुढील भागही त्यासोबतच एकाच दिशेला ओढला गेला. धडकेच्या आवाजाने आसपास राहणार्‍या नागरिकांनी लागलीच घटनास्थळाकडे धाव घेतली. अपघातग्रस्त झालेल्या दोन्ही वाहनांचे चालक वाहनातच फसल्याने नागरिकांनी मदत कार्य करीत त्यांना बाहेर काढले व खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या दोघांवरही उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्यावरच आडवी झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. याबाबत शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस काँस्टेबल गणेश घुले व महादू खाडे यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेत अपघातग्रस्त मालट्रक रस्त्याच्या बाजूला घेत एकाबाजूने वाहतूक सुरु केली. वृत्त लिहेपर्यंत चारचाकी वाहने घेवून निघालेला कंटेनर बाजूला झाला नव्हता, पोलिसांकडून त्यासाठी प्रयत्न सुरु होते.

Visits: 135 Today: 1 Total: 1795192

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *