सावरगाव तळच्या नवनिर्वाचित सदस्यांचा ग्रामस्थांकडून नागरी सत्कार
![]()
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील सावरगावतळ येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांचे नुकतेच ग्रामस्थांच्यावतीने गंगेच्या पवित्र पाण्याने पाय धुऊन नागरी सत्कार करण्यात आला.

सावरगावतळ हे तालुक्यातील एक अग्रगण्य गाव म्हणून ओळखले जाते. गावाने मागील काळात अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम केलेले आहे. आताही गाव पाणी फाउंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी आहे. दरम्यान, गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत असताना लोकांमधील निवडणुकीतून निर्माण होणारी कटूता टाळून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी दोन्हीही गटांना एकत्र करत पोलीस पाटील गोरक्ष नेहे, संतोष फापाळे आणि डॉ.शंकर गाडे यांनी मुख्य समन्वयकाची भूमिका पार पाडली. त्यांना दोन्हीही गटातील सर्व कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी सहकार्य केले. नुकतेच ग्रामस्थांच्यावतीने नवनिर्वाचित सदस्यांचे गंगेच्या पवित्र पाण्याने व गुलाब पाकळ्या टाकत सर्वांचे पाय धुऊन औक्षण केले आणि सर्वांना एक रोपटे भेट देऊन स्वागत केले. यावेळी पाणी फाउंडेशनचे राज्याचे मुख्य प्रशिक्षक संदेश कारंडे, विभागीय समन्वयक विक्रम फाटक, राजेंद्र जाधव, पोलीस पाटील गोरक्ष नेहे, वनपाल रामदास डोंगरे, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.शंकर गाडे, संतोष फापाळे, रवी नेहे, नामदेव थिटमे, पोपट थिटमे, राजाराम फापाळे, विलास नेहे, शंकर नेहे, हरिश्चंद्र नेहे, रावसाहेब थिटमे, परशराम नेहे, कारभारी गाडे, पत्रकार गोरक्ष नेहे, संदीप थिटमे, माधव नेहे, रमेश नेहे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

