छात्रभारतीच्या कार्यकर्त्याला पालिकेत धक्काबुक्की पालकमंत्र्यांसमोर घडला प्रकार; तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य मंत्रीमंडळाचे सदस्य नीलेश राणे यांच्या विरोधात पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमोरच घोषणाबाजी करणार्‍या छात्रभारतीच्या कार्यकर्त्याला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार आज संगमनेरात घडला. या घटनेनंतर उपस्थितांमधील काहींनी संबंधित कार्यकर्त्याला तेथून बाजूला नेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. अशा घटना राजकीय प्रक्रियेचा भाग असल्याने त्याला फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे सांगत पालकमंत्री तेथून निघून गेले. या प्रकाराबाबत छात्रभारतीचे तालुकाध्यक्ष अनिकेत घुले यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात जावून तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र वृत्त लिहेपर्यंत पोलिसांकडून कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.


याबाबत समजलेल्या माहितीनुसार जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आज संगमनेर तालुक्याच्या दौर्‍यावर होते. पाणीटंचाईच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी सकाळच्या सत्रात त्यांनी पालिकेत अधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. सुमारे तासभर सुरु असलेल्या या बैठकीनंतर ते सभागृहातून बाहेर येत असतानाच छात्रभारतीचे राज्य कार्याध्यक्ष अनिकेत घुले यांच्यासह मोहंमद कैफ, राम अरगडे व अन्य काही कार्यकर्ते मंत्री नीतेश राणे यांच्या विरोधातील निवेदन देण्यासाठी त्यांच्यासमोर आले. पालकमंत्री पालिका कार्यालयाच्या पायर्‍या उतरत असतानाच अनिकेत घुले यांनी मंत्री राणे यांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केल्याने तेथील वातावरण गंभीर बनले.


त्यामुळे तेथे उपस्थित असलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करणार्‍या अनिकत घुले व त्यांच्या सहकार्‍यांच्या दिशेने धाव घेत त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात पालकमंत्री विखे-पाटील यांनी संबंधित कार्यकर्ते कशासाठी आले आहेत अशी विचारणा केल्यानंतर त्यांना निवेदन द्यायचे असल्याचे समोर येताच मंत्री महोदयांनी त्यांना पुढे येण्यास सांगितले. यावेळी घुले निवेदनातील आशय सांगत असतानाच महायुतीचे काही कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले व त्यांनी ‘तुला कोणी पाठवले आहे हे माहिती आहे..’ असे सांगत पुन्हा त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. यावेळी काहींनी मध्यस्थी करीत त्या सर्वांना तेथून बाजूला नेल्याने पुढील अनर्थ टळला.


या घटनेवर भाष्य करताना पालकमंत्री विखे-पाटील यांनी असले प्रकार राजकिय प्रक्रियेचा भाग असल्याने त्याला फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे सांगितले. गोंधळ घालणारे कार्यकर्ते कोणाचे आहेत?, कोणाच्या इशार्‍यावरुन आले आहेत या गोष्टी लोकांना चांगल्या ठाऊक आहेत. आपल्यावर अशा कोणत्याही गोष्टींचा परिणाम होत नसल्याचे सांगत ते पुढील बैठकीसाठी रवाना झाले. या घटनेनंतर अनिकेत घुले यांच्यासह छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून संबंधिताविरोधात मारहाणीची तक्रार असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र वरीष्ठ अधिकारी नसल्याने अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.


याबाबत घुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मंत्री नीतेश राणे वारंवार अहिल्यानगर जिल्ह्यात येवून भडक वक्तव्य करीत असल्याने दोन समाजात तेढ वाढत असल्याचे सांगितले. संविधानाबाबतही त्यांच्याकडून वारंवार चुकीच्या गोष्टी घडत असल्याने यासर्व गोष्टींचा निषेध करीत त्यांना मंत्रीमंउळातून काढावे अशी मागणी करणारे निवेदन देण्यासाठी आपण आलो होतो. मात्र आपल्या आंदोलनाचा आणि निवेदनाचा राग आल्याने काहींनी आपल्यासह छात्रभारतीच्या पदाधिकार्‍यांना धक्काबुक्की व मारहाण करीत मोबाईल हिसकावून घेतल्याचे त्यांनी सांगितले. जो पर्यंत मारहाण करणार्‍यांवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत आपण पोलीस ठाण्यातून जाणार नसल्याचे सांगत त्यांनी ठिय्याही दिला आहे.

Visits: 4 Today: 4 Total: 305220

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *