पुणे-नाशिक महामार्गावरील जीवघेणे खड्डे बुजवा ः डोके … अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील जावळेवस्ती, डोळासणे, बोटा आदी ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या खड्यांमुळे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांना अपंगत्व येते तर काहींना बळी गमवाला लागून वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे संबंधित विभाग आणि कंपनीने तत्काळ याची दखल घेऊन खड्डे बुजवावेत. अन्यथा या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके यांनी इशारा दिला आहे.
पुणे व नाशिक या दोन महानगरांना जोडणार्या राष्ट्रीय महामार्गावरुन दररोज हजारो वाहने ये-जा करतात. या महामार्गाची निर्मिती करणारी कंपनी वाहनचालकांकडून टोल देखील वसूल करते. मात्र त्या बदल्यात कोणत्याही सोयी-सुविधा पुरविण्यात असमर्थ ठरत आहे. याचा परिणाम पावसाळ्यात महामार्गावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी महामार्गाच्या साईडपट्ट्या खचलेल्या आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होतो. यामध्ये निष्पाप प्रवाशांना अपंगत्व येण्यासह काहींचे बळी देखील जात आहे. तर वाहनांचे मोठे नुकसान होत आहे.
महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल परिसरातील नागरिक आणि वाहनचालक कायमच संबंधित कंपनीकडे विचारणा करत आलेले आहे. परंतु, कंपनी त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे. या संवेदनशील विषयावर ‘आम्ही संगमनेरकर’ या नावाखाली सर्वपक्षीयांनी टोलनाक्यावर आंदोलनही छेडले होते. तरी देखील कंपनीने दुरुस्तीबाबत पावले उचचले नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या सात-आठ दिवसांत खड्डे न बुजवल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने महामार्गावरील सर्व खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके यांनी दिला आहे.