संतप्त ग्रामस्थांचे आंबीफाटा येथे रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन कुरकुटवाडी-बोटा रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजविण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी ते बोटा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजविण्यात यावे म्हणून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी (ता.27) सकाळी आंबीफाटा येथे रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

पठारभागातील कुरकुटवाडी, आंबीदुमाला, म्हसवंडी या गावांतील सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थी, मालवाहतूक वाहने यांची नेहमीच वर्दळ असते. दळवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र, सद्यस्थितीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करताना अनेक छोटे-मोठे अपघात होत आहे. हे खड्डे बुजविण्याबाबत अनेकदा मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसत सोमवारी सकाळी आंबीफाटा येथे ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. या ठिय्या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, उपसरपंच बाळासाहेब कुरकुटे, माजी सरपंच अरुण कुरकुटे, खंडू जाधव आदी सहभागी झाले होते. रास्ता रोको आंदोलन संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन देण्यात आले. मात्र कोणतेही अधिकारी उपस्थित झाले नसल्याने ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले होते. शेवटी घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास देशमुख, किशोर लाड, संतोष फड उपस्थित होते.

Visits: 168 Today: 1 Total: 1957374

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *