संगमनेर तालुक्यातील एकतीस गावांत कडक निर्बंध लागू! मोठ्या गावांचाही समोवश; कंटेमेंट झोनचे सर्व नियम होणार लागू

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील कोरोना संसर्ग काही आटोक्यात येण्याचे नाव घेईना. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना हाती घेतल्या असून, पारनेर तालुक्यातील बारा गावांसोबतच आता संगमनेर तालुक्यातील 31 गावांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक मोठ्या गावांचाही समावेश आहे.

कोरोना नियंत्रण समितीमार्फत हा निर्णय घेण्यात आला असून कंटेनमेंट झोनचे सर्व नियम तेथे लागू करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून संगमनेर तालुक्यात अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागात नियमांचे काटेकोर पालन होत नसल्याचे पाहणीत आढळून आले होते. त्यामुळे आता निर्बंध कडक करण्यात आले आहेत.

संगमनेर तालुक्यातील 31 गावांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ही गावे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून प्रशासनाने जाहीर केली आहेत. खळी, पिंप्री लौकी आजमपूर, जाखुरी, पानोडी येथील हजारवाडी, राजवाडा, टेकेवाडी, ढोणेवस्ती, तळेगाव दिघे येथील भागवतवाडी, मनोली, घुलेवाडी येथील श्रीराम कॉलनी, कनोली, शेडगाव, पिंपरणे येथील राहिंज वस्ती, निमगाव बुद्रुक गावठाण, निमगावजाळी, आश्वी खुर्द मातंग वस्ती, राजापूर, सायखिंडी नन्नवरे वस्ती व खळी वाडग, गुंजाळवाडी दोन कुटुंब वस्ती, वनकुटे, चिकणी वर्पे वस्ती, आश्वी बुद्रुक, खांडगाव, वडगाव लांडगा, मांडवे बुद्रुक, चंदनापुरी, कोल्हेवाडी, चिंचपूर बुद्रुक, निमोण, मेंढवण, मालुंजे, पेमगिरी ही गावे 14 दिवस प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून कंटेमेंट झोनचे सर्व नियम तेथे लागू करण्यात आले आहेत. यातील काही गावांत पूर्वीच निर्बंध लावण्यात आल्याने त्यांची मुदत 1 ऑक्टोबरला संपणार असून काहींची मुदत त्यानंतरच्या आठवड्यापर्यंत आहे.

विस्तार आणि लोकसंख्येने मोठा असलेल्या संगमनेर तालुक्यात सुरुवातीपासूनच रुग्णसंख्या अधिक राहिली आहे. आत्तापर्यंत 32 हजार 329 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. पैकी 31 हजार 347 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 879 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. दैनंदिन रुग्णसंख्या बहुतांश दिवस शंभरच्या पुढेच आहे. त्यामुळे तालुक्यांतील 31 गावांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Visits: 4 Today: 1 Total: 30189

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *